Join us

राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 18:36 IST

Shiv Sena Thackeray Group Sanjay Raut News: भाजपाला ठाकरे नाव नष्ट करायचे आहे. मी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. कालही या विषयांवर चर्चा झाली. सर्व ठाकरे एक आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Shiv Sena Thackeray Group Sanjay Raut News: भारतीय जनता पक्षाला ठाकरे हे नाव नष्ट करायचे आहे. अशावेळी जर दोन्ही ठाकरेंनी साद आणि प्रतिसाद ही भूमिका घेतली असेल तर महाराष्ट्र स्वागत करेल. आम्ही आता उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडल्यानंतर प्रतिक्षा करणार आहोत. आम्ही नक्कीच सकारात्मक भूमिकेतून या सगळ्या गोष्टींकडे पाहत आहोत. शेवटी महाराष्ट्राच्या कल्याणाचा विषय आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

आगामी मुंबईसह राज्यभरातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. राज ठाकरे यांनी ठाकरे गटाशी युतीबाबत आपले मत व्यक्त केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही काही अटी घालत साद घातली. यानंतर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना चांगलेच बळ मिळाले. यासंदर्भात राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी संजय राऊत यांना राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. 

राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?

आता हा तुमचा प्रश्न पुढचा आहे. या प्रश्नावर आत्ता उत्तर देणार नाही. महाविकास आघाडी ही आमची राजकीय व्यवस्था महाराष्ट्रासाठी केलेली आहे. राज ठाकरे हे सध्याच्या परिस्थितीत भाजपा किंवा शिंदे गट यांच्याबरोबर आम्हाला दिसत आहेत. त्यामुळे आमच्या दृष्टीने ते महाराष्ट्राच्या हिताचे काम करत नाहीत. राज ठाकरे यांचा वापर करून भाजपा महाराष्ट्रात मराठी माणसांना त्रास देण्याचे कारस्थान पडद्यामागून करत आहे. हे राज ठाकरे यांच्या लक्षात आले असेल तर हे मराठी माणसांवर उपकार होतील, असे संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, राज ठाकरेंची भूमिका नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही. आम्ही हवेत बोलत नाहीत. राज ठाकरे-उद्धव ठाकरे युतीबाबत दोघे एकमेकांना का बोलणार नाहीत? मी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. ही मुंबई आणि महाराष्ट्र आणि मराठी माणसांवर कोणी घाव घालत असेल तर एकत्र यावेच लागेल. मात्र, आम्ही वाट पाहू, अधिक चांगले घडण्याची आम्ही वाट पाहू. सर्व ठाकरे एक आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाउद्धव ठाकरेराज ठाकरेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनामनसेमहाविकास आघाडीमहाराष्ट्र विकास आघाडी