Shiv Sena Shinde Group News: ५१ वर्षे ‘मातोश्री’ सोबत प्रामाणिक राहिलो. ३१ वर्ष बेस्ट कामगार सेनेची धुरा वाहिली. निवडणूक हरलो म्हणून त्या पदावरून बाजूला केले. माझ्या मुलाचे निधन झाले. त्याला एक महिना व्हायच्या आतच इतरांची नेमणूक केली. माझी ५१ वर्षांची कारकीर्द एका क्षणात शून्य झाली. माझे दु:ख पक्षश्रेष्ठींसमोर मांडले होते. तुम्ही महिनाभर थांबू शकला असतात. दुसऱ्यांच्या भावनांशी किती खेळायचे, दुसऱ्यांच्या भावनांची कदर नेत्यांनी नाही, तर कोणी का करायची, अशा शब्दांत तीव्र भावना मांडत ठाकरे गटाच्या बड्या नेत्याने उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
बेस्ट कामगार सेनेचे माजी अध्यक्ष सुहास सामंत यांनी ठाकरे गटाला रामराम केला आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सुहास सामंत यांनी साथ सोडल्यामुळे उद्धव ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. सामंत यांच्याकडे ठाकरे गटाचे उपनेतेपद होते. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर गेल्या दोन अडीच वर्षात मोठ्या प्रमाणावर माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. ठाकरे यांची साथ सोडून शिंदे यांच्या पक्षात येणाऱ्यांची संख्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणूक हरलो, म्हणून माझा बळी दिला
बेस्टच्या पतपेढीची निवडणूक हरलो, म्हणून माझा बळी दिला. मला राजीनामा द्यायला लावला. दोन भावांना एकत्र करून निवडणूक लढवली, हीच माझी चूक झाली. निवडणुकीत पराजय झाला. सोसायटीच्या निवडवणुकीत अनेकदा हरलो. जिंकलो असतो तर दोन्ही भावांनी आपली पाठ थोपटली असती, आम्ही दोघे एकत्र आलो म्हणून जिंकलो असे म्हटले असते आणि हरलो तर माझा बळी दिला, असा आरोप सामंत यांनी यावेळी बोलताना केला.
बेस्ट प्रमाणेच सुहास सामंत यांचे काम 'बेस्ट'
बेस्ट प्रमाणेच सुहास सामंत यांचे काम 'बेस्ट' आहे. त्यांच्यावर शिवसेनेच्या उपनेतेपदाची जबाबदारीही सोपविण्यात आली. बेस्ट सेवा ही मुंबईची जीवनवाहिनी आहे, ती टिकवणे आणि वाढवणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. माझ्या कार्यकाळात मी साडे तीन हजार कोटी बेस्टला दिले, कर्मचाऱ्यांना बीएमसी कर्मचाऱ्यांएवढाच बोनस दिला, बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या बसेस वाढवण्याची मागणी पुढे आली आहे, ती देखील नक्की पूर्ण करू, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
महायुतीचा महापौर बसला तरच बेस्टच्या हिताचे निर्णय
बेस्टचे चाक पुन्हा नफ्यात आणण्यासाठी आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन जोमाने प्रयत्न करू या, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना केले. बेस्ट कर्मचारी आणि अधिकारी सेनेला अधिक बळकटी आणण्यासाठी प्रयत्न करा. सर्व संलग्न संघटनांना एकत्र आणून बेस्टच्या हितासाठी काम करा, तसेच आगामी पालिका निवडणुकीत महायुतीचा महापौर बसला तरच बेस्टच्या हिताचे निर्णय घेता येणे शक्य होणार आहे, त्यामुळे त्यासाठी सर्वांनी आतापासून कंबर कसून कामाला लागा, अशी अपेक्षा एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, ऑगस्ट महिन्यात बेस्टच्या पतपेढीची निवडणूक झाली. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे ही निवडणूक विशेष गाजली. महायुती आणि ठाकरे बंधूंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यात बेस्ट कामगार सेनेने ठाकरे बंधूंचे पॅनेल उभे केले होते. या पॅनेलचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. या पराभवानंतर सामंत यांनी राजीनामा दिला. त्यानंतरच्या काळात सामंत यांच्या मुलाचेही निधन झाले. यातच उद्धव ठाकरे यांनी कामगार सेनेच्या अध्यक्षपदी सचिन अहिर यांची नेमणूक केली.
Web Summary : Suhas Samant, a former leader in the Thackeray faction, joined Eknath Shinde's group, citing years of loyalty dismissed after an election loss and alleged insensitivity following his son's death. He claims neglect despite decades of service.
Web Summary : ठाकरे गुट के पूर्व नेता सुहास सामंत, एकनाथ शिंदे के गुट में शामिल हो गए, उन्होंने चुनाव हारने के बाद वर्षों की वफादारी को खारिज करने और बेटे की मृत्यु के बाद कथित असंवेदनशीलता का हवाला दिया। उन्होंने दशकों की सेवा के बावजूद उपेक्षा का दावा किया।