अब तक ५०! धक्के सुरूच, माजी नगरसेवकांचा उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत केला प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 10:39 IST2025-03-11T10:36:56+5:302025-03-11T10:39:19+5:30
Shiv Sena Shinde Group And Thackeray Group: ठाकरे गटातून सातत्याने माजी नगरसेवक शिंदेसेनेत प्रवेश करत आहेत.

अब तक ५०! धक्के सुरूच, माजी नगरसेवकांचा उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत केला प्रवेश
Shiv Sena Shinde Group And Thackeray Group: २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. तर एकनाथ शिंदे यांना विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले. यानंतर आता खरी शिवसेना नेमकी कुणाची, यावर जनतेने शिक्कामोर्तब केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. विधानसभा निवडणुकांनंतर ठाकरे गटाला लागलेली गळती थांबता थांबत नाही. एकीकडे मुंबई महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा बाजी मारण्यासाठी उद्धव ठाकरेंनी जोरदार तयारी सुरू केली असली, तरी दुसरीकडे माजी नगरसेवक, पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते पक्षाला जय महाराष्ट्र करत असल्याने ठाकरे गटाला निवडणूक अधिक आव्हानात्मक ठरू शकते, असे म्हटले जात आहे.
पुण्यातील कसबा पेठचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. त्याआधी कुर्ल्यातील माजी नगरसेविका डॉ. अनुराधा पेडणेकर यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे गटातून सातत्याने माजी नगरसेवक शिंदेसेनेत प्रवेश करत आहेत. ठाकरे गटाकडून आतापर्यंत ५० माजी नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत गेले आहेत, असे समजते.
इच्छूकांना डावलले, ठाकरे गटाचे नेते शिंदेसेनेत आले
वर्सोवा मतदारसंघांसाठी राजू पेडणेकर आणि राजुल पटेल हे इच्छुक होते. मात्र या दोघांना डावलून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अल्पसंख्यांक उमेदवार दिला होता. या निवडणुकीत राजू पेडणेकर यांनी बंडखोरी केली होती. जानेवारी महिन्यात वर्सोवा मतदारसंघातील राजुल पटेल यांनी ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ केला. पंधरा दिवसांपूर्वी वांद्रे विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे उपविभागप्रमुख जितेंद्र जनावळे यांनीही शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यानंतर माजी नगरसेवक राजू पेडणेकर, माजी नगरसेवक आणि उपविभागप्रमुख संजय पवार यांनी ठाकरे यांची साथ सोडली आहे. तसेच कुर्ल्यातील माजी नगरसेविका डॉ. अनुराधा पेडणेकर यांनीही शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
दरम्यान, या माजी नगरसेवकांसोबत शाखाप्रमुख, उपविभागप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, उत्तर भारतीय कार्यकर्ते, महिला आघाडी, युवा सेना, वारकरी संप्रदाय, मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते. या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले.