बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 00:16 IST2025-12-06T00:10:54+5:302025-12-06T00:16:26+5:30
Deputy CM Eknath Shinde Chembur News: संविधानामुळे देश प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहे. समाजातील सर्वात शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्याय पोहोचणे हा बाबासाहेबांचा मुख्य संदेश होता, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
Deputy CM Eknath Shinde Chembur News: “शिका, संघटित व्हा” हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मूलमंत्र आजही समाजाला दिशा देतो. भारताची सार्वभौम राज्यघटना बाबासाहेबांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार केली असून, या संविधानाच्या बळावरच देशातील सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळतो आणि देशाचा कारभार लोकशाही मार्गाने सुचारूपणे चालतो, असे उद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात आयोजित ‘भीम ज्योत’ लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमात स्थानिक जनप्रतिनिधी, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. देशातील दलित, शोषित, वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला. समाजातील सर्वात शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्याय पोहोचणे हा बाबासाहेबांचा मुख्य संदेश होता, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
संविधानामुळे देश प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहे
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, बाबासाहेबांनी जगातील अनेक संविधानांचा अभ्यास करून भारताचे संविधान तयार केले. हे संविधान जगातील सर्वोत्तम घटनांपैकी एक आहे. याच संविधानामुळे देश प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहे. सामान्य माणूसही बाबासाहेबांनी दिलेल्या तत्त्वज्ञानामुळे आणि संविधानिक हक्कांमुळे उच्च पदापर्यंत पोहोचू शकतो.
दरम्यान, चेंबूरमध्ये उभारण्यात आलेली ‘भीम ज्योत’ ही केवळ स्मारक ज्योत नसून, बाबासाहेबांच्या विचारांची अखंड प्रेरणा देणारी प्रतिमात्मक ज्योत आहे, असे शिंदे यांनी नमूद केले. ही ज्योत बाबासाहेबांच्या शिकवणीची आठवण सतत करून देत राहील. बाबासाहेबांना मनःपूर्वक अभिवादन करतो, असे ते म्हणाले.