Join us

विधानसभेत भास्कर जाधव संतापले, अजित पवारांनी सावरले; सभागृहात नेमकं काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 13:15 IST

Vidhan Sabha, Mansoon Session: विधानसभेत अध्यक्षांकडून सन २०२२ चे विधेयक क्रमांक १७ मांडण्याच्या सूचना मंत्र्यांना देण्यात आल्या.

मुंबई - विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेत घोषणाबाजी केली. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी निदर्शने केली. त्यानंतर सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिनंदनाचा ठराव मांडल्यानंतर कामकाजाला सुरुवात झाली. यावेळी सरकारकडून विधेयकं मांडली जात होती. मात्र या विधेयकाच्या आकडेवारीवरून घोळ झाल्यानं शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव संतापले. 

विधानसभेत अध्यक्षांकडून सन २०२२ चे विधेयक क्रमांक १७ मांडण्याच्या सूचना मंत्र्यांना देण्यात आल्या. त्यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी सन २०२२ विधानसभा विधेयक क्रमांक १८ महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा विधेयक सभागृहात ठेवले. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी सन २०२२ चे विधेयक क्रमांक १७ महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सुधारणा विधेयक पुकारताच सभागृहात गोंधळ उडाला. घाईघाईने अध्यक्षांनी हे विधेयक मांडून त्यावर प्रस्ताव पारित करून घेतला. 

मात्र त्यावर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पॉईंट ऑफ ऑर्डर उपस्थित करून म्हटलं की, सभागृहात कामकाज रेटून न्यावं अशी परिस्थिती नाही. सभागृहाचा पहिला दिवस आहे. काही उणीवा, चुका राहत असतील तर तो ऐकून तर घ्या. आपण विधेयक १६ पुकारलं, मंत्री महोदयांनी १७ मांडले. रेकॉर्ड चेक करा. त्यावर अध्यक्षांनी मी १७ पुकारलं असं सांगितले. त्यावर भास्कर जाधव संतापले, अख्खं सभागृह खोटं बोलतंय तुम्ही खरे बोलताय का? असं म्हटलं. 

त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी उभे राहत सांगितले की, अध्यक्षांनी पहिलं विधेयक १६ पुकारलं ते मंजूर झाले. त्यानंतर १७ पुकारले. त्यानंतर मंत्र्यांनी क्रमांक १८ विधेयक मांडले. खात्याचे विधेयक मांडताना व्यवस्थित आकडे मांडले गेले पाहिजेत. सभागृहात त्याच्याबद्दल काही सदस्यांनी आक्षेप नोंदवला. या गोष्टीला महत्त्व देऊन दुरुस्ती करावी. समज द्यावी. पहिलाच दिवस आहे. मंत्री बाहेर निघून जातात असं नाही चालत. नियमाने वागलं पाहिजे असं दादांनी सभागृहात सांगितले. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी तपासून घेऊ असं सांगत सभागृह शांत करण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :अजित पवारभास्कर जाधवगिरीश महाजन