खबरदार, डमी विद्यार्थी बसवलात तर..., १०-१२वी परीक्षेत गैरप्रकार आढळल्यास शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 13:20 IST2023-02-04T13:20:25+5:302023-02-04T13:20:52+5:30
Exam Update: दहावी-बारावी परीक्षेसाठी यापुढे जर कोणाही विद्यार्थ्यांकडून परीक्षेला डमी विद्यार्थी बसलेला आढळून आला तर विभागीय मंडळाकडून संबंधित विद्यार्थ्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

खबरदार, डमी विद्यार्थी बसवलात तर..., १०-१२वी परीक्षेत गैरप्रकार आढळल्यास शिक्षा
मुंबई : दहावी-बारावी परीक्षेसाठी यापुढे जर कोणाही विद्यार्थ्यांकडून परीक्षेला डमी विद्यार्थी बसलेला आढळून आला तर विभागीय मंडळाकडून संबंधित विद्यार्थ्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दहावी आणि बारावी परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मंडळाने यावर्षी कडक पावले उचलली असून गैरमार्ग अवलंबल्यास होणाऱ्या शिक्षेची यादीच जाहीर केली आहे.
यंदा मंडळाकडून गैरप्रकार रोखण्यासाठी कडक कारवाई करण्यात येणार असून परीक्षेपूर्वी आणि प्रात्यक्षिक परीक्षांच्या काळात शिक्षासूचीचे सामूहिक वाचन विद्यार्थ्यांसमोर करणे, शक्य असल्यास शिक्षासूचीची प्रत प्रत्येक विद्यार्थ्याला देण्याच्या सूचना शिक्षण मंडळाने शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना दिल्या आहेत. या सूचना सर्व विद्यार्थ्यांकडून वाचून घ्याव्यात असेही मंडळाने म्हटले आहे.
अशी असेल कारवाई
परीक्षेसाठीच्या अर्जामध्ये खोटी माहिती भरल्यास : विद्यार्थ्याला परीक्षेत प्रतिबंधित करणे. संपादणूक (इव्हॅल्यूएशन) रद्द करणे.
खोटी वैद्यकीय प्रमाणपत्रे दाखवून सवलत घेणे : परीक्षेला प्रतिबंधित करणे, संपादणूक रद्द करणे, पोलिसात गुन्हा दाखल करणे
परीक्षेला डमी विद्यार्थी बसविणे : संपादणूक रद्द करणे, फौजदारी गुन्हा दाखल करणे
प्रश्नपत्रिकांची चोरी, विकणे किंवा प्रश्नपत्रिका व्हायरल करणे : परीक्षेची संपादणूक रद्द करून पुढील ५ वर्षासाठी प्रतिबंधित करणे, सायबर कायद्यानुसार गुन्हा दाखल करणे
परीक्षेवेळी पॅडवर, हातावर, शरीराच्या कुठल्याही भागावर लिहिणे, चिट्ठी सापडणे : संबंधित विषयाची संपादणूक रद्द करणे