Bhandup BEST Bus Accident: अपघाताची बेस्टमार्फत चौकशी; १४ जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 12:45 IST2025-12-31T12:43:31+5:302025-12-31T12:45:08+5:30
Mumbai BEST Bus Accident Aid: भांडूप पोलिसांनी बेस्टचालक संतोष सावंत (५२) याला अटक केली आहे...

Bhandup BEST Bus Accident: अपघाताची बेस्टमार्फत चौकशी; १४ जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत
मुंबई : भांडूप रेल्वेस्थानकाबाहेर सोमवारी रात्री झालेल्या बस अपघाताची चौकशी बेस्टच्या विभागांतर्गत समितीमार्फत करण्याचे निर्देश सहायक महाव्यवस्थापकांनी मंगळवारी दिले. या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला, तर १४ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. भांडूप पोलिसांनी बेस्टचालक संतोष सावंत (५२) याला अटक केली आहे.
सोमवारी रात्री भांडूप रेल्वेस्थानक (पश्चिम) या बसस्थानकातून बस बाहेर येत असताना चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बसने पादचाऱ्यांना आणि बस थांब्यावर रांगेत बसच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या प्रवाशांना धडक दिली. जखमींना पालिकेच्या राजावाडी व सायन रुग्णालयात तसेच, काही जखमी प्रवाशांना अगरवाल, फोर्टीज, महावीर, मिनाज या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, बेस्ट अपघातातील जखमींना योग्य ती वैद्यकीय मदत व साहाय्य करण्याची हमी बेस्ट प्रशासनाने दिली आहे. अपघातातील मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी रुपये २ लाख आर्थिक मदत देण्याचे व जखमी व्यक्तींना वैद्यकीय मदत देण्यात
येणार आहे.
कुणावर कुठे उपचार अन् किती जणांना डिस्चार्ज?
किरकोळ जखमींना मुलुंडमधील अगरवाल रुग्णालयात दाखल केले. तर, गंभीर जखमींना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
एम. टी. आगारवाल रुग्णालयात वर्षा सावंत (२५), मानसी मेघश्याम गुरव (४९) आणि प्रशांत शिंदे (५३) यांना नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. याच रुग्णालयात नारायण कांबळे (५९), मंगेश दुखांडे (४५) आणि ज्योतीशिर्के (५५) हे उपचार घेत आहेत.
सायन रुग्णालयात शीतल प्रकाश हडवे (३९) आणि रामदासरूपे (५९) या किरकोळ जखमींवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, फोर्टिसमध्ये प्रताप कोरपे (६०), हिरा मोंगी रुग्णालय, मुलुंड येथे रवींद्र घाडगावकर (५६), तर भांडूप येथील मिनाझ रुग्णालयात दिनेश विनायक सावंत (४९) आणि पूर्वा संदीप रसाम (१२) यांच्यावर उपचार सुरू आहेत.