अपुऱ्या बस, वाढते अपघात, तरी 'बेस्ट' पुरस्काराचा मानकरी कसा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 12:04 IST2025-03-13T12:04:26+5:302025-03-13T12:04:46+5:30
कामगार संघटनांचा सवाल; सार्वजनिक परिवहन उत्कृष्टतेच्या गौरवाने भुवया उंचावल्या

अपुऱ्या बस, वाढते अपघात, तरी 'बेस्ट' पुरस्काराचा मानकरी कसा?
मुंबई : 'असोसिएशन ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग' यांच्याकडून बेस्ट उपक्रमाला ८ मार्चला राष्ट्रीय सार्वजनिक परिवहन उत्कृष्टता पुरस्काराने गौरवण्यात आले. रस्ते सुरक्षितता, विनाप्रवर्तन महसूल आणि वैकल्पिक वाहन इंधन, अशा विविध श्रेणींसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. मात्र, उपक्रमाकडे स्वतःच्या मालकीच्या बसचा पुरेसा ताफा नसताना तसेच अपघातांचे प्रमाण वाढलेले असताना हा पुरस्कार मिळाल्याने कर्मचारी आणि कामगार संघटनांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
'बेस्ट'च्या वाहतूक विभागाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल 'असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग'तर्फे दिल्ली येथे माजी राज्यपाल किरण बेदी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. महाव्यवस्थापक एस. व्ही. आर. श्रीनिवासन यांनी हा पुरस्कार स्वीकारला. संपूर्ण देशात शहरी भागात एक हजारपेक्षा जास्त प्रवासी बसगाड्यांची संख्या असलेल्या विविध परिवहन उपक्रमातून 'बेस्ट'ची निवड करण्यात आली. मात्र, भविष्यात 'बेस्ट' टिकेल की नाही, याची शाश्वती नसताना हा पुरस्कार कसा मिळतो, हा संशोधनाचा विषय असल्याची टीका कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी केली.
'बेस्ट'ने स्वतःच्या मालकीच्या ४,००० बस तातडीने घ्याव्यात, तसेच कंत्राटी बस उपक्रमातून हद्दपार करून, स्वतःच्या बस आणि कर्मचारी भरतीसाठी कनकिया आणि वाधवा ग्रुपकडे थकीत असलेले ४५० कोटी थकबाकी व्याजासह तत्काळ वसूल करणे क्रमप्राप्त आहे - रूपेश शेलटकर, आपली बेस्ट आपल्यासाठी संघटना
'असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग'तर्फे माजी राज्यपाल किरण बेदी यांच्या हस्ते 'बेस्ट'ला राष्ट्रीय सार्वजनिक परिवहन उत्कृष्टता पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. रस्ते सुरक्षितता, विनाप्रवर्तन महसूल आणि वैकल्पिक वाहन इंधन, अशा विविध श्रेणींसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
'कायमस्वरूपी महाव्यवस्थापक हवा'
'बेस्ट'ला नवजीवन द्यायचे असेल तर कायमस्वरूपी महाव्यवस्थापकांची नेमणूक करणे आवश्यक आहे. मागील काही वर्षे तात्पुरता पदभार दिलेल्या अधिकाऱ्यांमुळे 'बेस्ट' चालवणे कठीण होत आहे.
त्यामुळे या विषयावर चर्चा करण्यासाठी बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून वेळ मागितली आहे.