बेस्टच्या कामगारांच्या पतपेढीची निवडणूक पार पडली आहे. आज निकालही समोर आला असून दोन्ही ठाकरे बंधुंना भोपळाही फोडता न आल्याने भाजपानेउद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना 0+0 चे उत्तर शून्यच येत असल्याचे म्हणत हिणविण्यास सुरुवात केली आहे. आता या निवडणुकीच्या निकालावर ठाकरे गटाची प्रतिक्रिया आली आहे.
ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनल विरोधात भाजपकडून ५ संघटनांचे संयुक्त सहकार समृद्धी पॅनल मैदानात उतरवण्यात आले होते. निवडणुकीसाठी मतदारांना पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला होता. तसेच समृद्धी पॅनलच्या पॅम्प्लेटसोबत पैसे देण्यात आल्याचेही त्यांनी व्हिडीओत दाखविले होते. आता ठाकरे गटाचे सुहास सामंत यांनी पैशांसमोर आम्ही कमी पडलो अशी प्रतिक्रिया दिली आहे.
बेस्ट पतपेढी निवडणूक झाली, त्याचा निकाल देखील लागला आहे. दुर्दैवाने आम्ही त्यात हरलो. जे जिंकले त्यांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती आहे की, मागच्या ९ वर्षात बेस्ट पतपेढी एका उंचीवर आम्ही नेलेली आहे आणि ती उंची आपण कायम ठेवावी. यातून कामगारांची सेवा व्हावी ही इच्छा आहे. या निवडणुकीत प्रचंड पैशांचा ओघ आला आणि त्याच्यासमोर आम्ही टिकू शकलो नाही, असे सामंत म्हणाले.
आम्ही कमी पडलो केवळ पैशांमध्ये आणि भाजपाने सगळी यंत्रणा पैशांसह, अधिकाऱ्यांसह उतरवली होती. कुठली गोष्ट मिळत नाही तर अशाप्रकारे सत्तेचा वापर करायचा, हे त्यांचे काम आहे. मी २५ वर्ष बेस्टच्या कर्मचाऱ्यांसोबत आहे, त्यांच्या व्यथा मला माहित आहेत. मी माझ्या कर्मचाऱ्यांबरोबर राहणार, मी माझ्या कर्मचाऱ्यांची सेवा करणार, असे सामंत म्हणाले.