Best Election 2025 Result: ठाकरे बंधुंच्या युतीमुळे चर्चेत आलेल्या बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत उद्धवसेना व मनसेच्या उत्कर्ष पॅनलचा दारूण पराभव झाला. २१ जागांपैकी कामगार नेते शशांक राव पॅनलचे १४ तर भाजपचे आ. प्रसाद लाड यांच्या सहकार समृद्धी पॅनलचे ७ उमेदवार विजयी झाले. ठाकरे बंधूंचा २१-० ने पराभव झाल्यानंतर भाजपासह महायुतीतील अनेक नेत्यांनी ठाकरेंवर टीका केली. यातच शिवसेना भवनसमोर काही बॅनर लागल्याचे सांगितले जात आहे.
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा पराभव झाल्यानंतर भाजपाकडून ठाकरे गटाला डिवचण्यात आले आहे. दादरच्या शिवसेना भवन परिसरात भाजपाची जोरदार बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे भाजपाने हा बॅनरद्वारे फक्त उद्धव ठाकरेंवर टीका केल्याचे पाहायला मिळत आहे. या बॅनरवर राज ठाकरेंचा फोटो किंवा मनसेला उद्देशून काहीही देण्यात आलेले नाही.
ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात
ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात, असे लिहून शिवसेना भवन परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, रविंद्र चव्हाण आणि आशिष शेलार यांचे फोटो पाहायला मिळत आहेत. त्यासोबतच या बॅनरवर उद्धव ठाकरेंचाही एक फोटो पाहायला मिळत आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची मानली जात होती. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीची लिटमस टेस्ट म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात होते. मात्र या निवडणुकीतील पराभवामुळे ठाकरे बंधूंना धक्का बसला आहे.
दरम्यान, बेस्ट सोसायटीची निवडणूक ही कामगार क्षेत्रातील पहिली स्वतंत्र निवडणूक असून पक्षीय पाठिंबा न घेता आम्ही ७ जागांवर विजय मिळवला. ८ जागा अवघ्या ३० ते ४० मतांच्या फरकाने निसटल्या असून कमी फरकाने पराभूत झालेल्या जागांसाठी फेरमतमोजणी करण्याची मागणी आ. प्रसाद लाड यांनी केली आहे.