बेस्टमधील वाद; चालक-वाहकाचा प्रवाशावर हल्ला; साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:50 IST2026-01-01T14:49:27+5:302026-01-01T14:50:51+5:30
बस शेवटच्या थांब्यावर, साई किरण हॉटेलसमोर उभी असताना सायंकाळी ७:४५ ते रात्री ८ वाजण्याच्या सुमारास बसचालकाने हातातील कड्याने निकम यांच्या डोक्यावर मारहाण केली.

बेस्टमधील वाद; चालक-वाहकाचा प्रवाशावर हल्ला; साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
मुंबई : बेस्ट बसमधील वादातून प्रवासी रतन निकम (६०) यांना वाहक आणि चालकाने मारहाण केल्याची घटना साकीनाका परिसरात ३० डिसेंबरला घडली. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले आहेत. याप्रकरणी बसचालक व वाहकाविरोधात साकीनाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
साकीनाका येथील संघर्ष नगरमध्ये राहणारे निकम हे ३० डिसेंबरला दुपारी खार येथे मित्राच्या अंत्यदर्शनासाठी गेले होते. तेथून ते अंधेरी येथे आले. सायंकाळी सुमारे ६:४५ वाजता संघर्ष नगरकडे जाणाऱ्या बेस्ट बस क्र. ३३५ मध्ये ते बसले. साकीनाका पोलिस ठाण्यासमोर चांदिवली फार्म रोड येथे काही प्रवासी उतरले. त्या वेळी काही महिला प्रवासी न उतरल्याने बस पुढे घ्यावी, अशी विनंती निकम यांनी वाहकाला केली. त्यावरून चालक, वाहक आणि निकम यांच्यात वाद झाला. अखेर वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करून निकम यांना बसमधून उतरवले.
हातातील कड्याने मारहाण -
बस शेवटच्या थांब्यावर, साई किरण हॉटेलसमोर उभी असताना सायंकाळी ७:४५ ते रात्री ८ वाजण्याच्या सुमारास बसचालकाने हातातील कड्याने निकम यांच्या डोक्यावर मारहाण केली.
या वेळी वाहकानेही हाताने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या हल्ल्यात निकम यांच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला.
निकम यांना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेल्यानंतर त्यांच्या डोक्यावर टाके घालण्यात आले. उपचारानंतर त्यांनी बसचालक व वाहकाविरोधात शिवीगाळ व मारहाणप्रकरणी तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.