सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सवलतीचा 'प्रकाश';बेस्ट निर्णयामुळे सजणार भक्तीची आरास
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 12:15 IST2025-08-10T12:15:10+5:302025-08-10T12:15:34+5:30
गणेशोत्सवासाठी तात्पुरत्या वीजपुरवठ्याचे अर्ज स्वीकारण्यासाठी सुविधा कक्ष सुरू

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सवलतीचा 'प्रकाश';बेस्ट निर्णयामुळे सजणार भक्तीची आरास
मुंबई : मुंबापुरीला सण-उत्सवांचे वेध लागले असून, नारळी पौर्णिमेसह रक्षाबंधनानंतर आता गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. या उत्सव काळात सार्वजनिक मंडळांना निवासी सवलतीच्या दरात विजेचा पुरवठा देण्याचा निर्णय बेस्टच्या विद्युत विभागाने घेतला आहे.
प्रत्येक ग्राहक सेवा विभागात गणेशोत्सवासाठी तात्पुरत्या वीजपुरवठ्याचे अर्ज स्वीकारण्यासाठी सुविधा कक्ष सुरू केले आहेत. ज्या मंडळांना मागणी अर्ज ऑनलाइन नोंद करायचे असल्यास त्यांनी वेबसाइटवर जाऊन अर्ज नोंदणी करावी लागणार आहे. अर्जाची प्रिंट संबंधित ग्राहक सेवा विभागात जमा करावी लागणार आहे. त्यानुसार संबंधित मंडळांना सवलतीत वीजपुरवठा करण्यात येणार असल्याचे बेस्टच्या विद्युत विभागाने सांगितले.
परवान्यांना विलंब
मंडळांना परवाने मिळण्याबाबत दरवर्षी विलंब होतो. कार्यकर्त्यांना सरकारी कार्यालयात चकरा माराव्यात लागतात. तरीही परवाने मिळविताना उत्सवाचे नाही म्हटले तरी सुरुवातीचे तीन दिवस सहज उलटून गेलेले असतात.
नियम आणि अटी
गणेश मंडपाची व्यवस्था आहे, त्या जागेच्या मालकाची/गृहनिर्माण संस्थेची परवानगी आवश्यक आहे. वीज अपघात टाळण्यासाठी मंडळांनी मंडपात योग्य क्षमतेचे वायरिंग मान्यताप्राप्त ठेकेदाराकडून करून घ्यावे.
फूटपाथवर मंडपाची उभारणी करणाऱ्या मंडळांनी पालिकेकडून मंडप उभारणीचे ना-हरकत प्रमाणपत्रही जोडणे आवश्यक आहे. पोलिस ठाण्याच्या परवानगीची यावर्षीची प्रत अथवा गतवर्षीची प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
कागदपत्रे नसल्यास संबंधित पोलिस ठाण्यात अर्ज केल्याची पोहोच पावतीची छायांकित प्रत अर्जासोबत जोडावी. ज्या केबिनमध्ये तात्पुरता मीटर हवा असेल त्याच केबिनमधील कुठल्याही एका मीटरचे चालू बिल अर्जासोबत जोडावे.
बिलातील विविध शुल्क
तात्पुरत्या जोडणीसाठी स्थिर आकार, इंधन समायोजन आकार, वीजपुरवठा शुल्क, महाराष्ट्र कर व इतर कराचा समावेश वीजबिलात असणार आहे. अशा रीतीने गणेश मंडळांना निवासी स्वरूपाच्या सवलतीच्या दरपत्रकाप्रमाणे वीजदर आकारले जाणार आहेत.