मुंबईत ‘बेस्ट’चे अपघात वाढले; ५८ चालक बडतर्फ, ६०३ निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 12:57 IST2026-03-10T12:56:19+5:302026-03-10T12:57:06+5:30
‘बेस्ट’ बस अपघात वाढले असून बेस्ट उपक्रमासह भाडेतत्त्वावरील बस पुरवठा संस्थेच्या ५८ चालकांना बडतर्फ केले आहे.

मुंबईत ‘बेस्ट’चे अपघात वाढले; ५८ चालक बडतर्फ, ६०३ निलंबित
मुंबई : ‘बेस्ट’ बस अपघात वाढले असून बेस्ट उपक्रमासह भाडेतत्त्वावरील बस पुरवठा संस्थेच्या ५८ चालकांना बडतर्फ केले आहे, तर ६०३ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
तसेच, बेस्ट सेवेबाबत सविस्तर चर्चेसाठी मुंबईतील सर्व आमदारांची बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानपरिषदेत दिले.
आ. सुनील शिंदे यांनी ‘बेस्ट’च्या अपघातांसंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. तसेच या प्रश्नाकडे आ. सुनील शिंदे, आ. प्रवीण दरेकर. आ. सचिन अहिर यांनी लक्ष वेधले.
२०० बस चालकांना प्रशिक्षण
राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या, बेस्ट उपक्रमाद्वारे भविष्यात होणारे अपघात टाळण्यासाठी चालकांना इलेक्ट्रिक बसचालनाचे प्रशिक्षण देण्यासाठी उजळणी वर्गाचा कालावधी वाढविण्यात आला आहे, तर २०० बसचालकांना प्रायोगिक तत्त्वावर अद्ययावत प्रणालीवर प्रशिक्षण देण्यात आले आहे.
किमान १० हजार बसची आवश्यकता
मुंबईची लोकसंख्या व प्रवाशांची गरज लक्षात घेऊन किमान १० हजार बसची आवश्यकता आहे. यासाठी विविध कंत्राटदारांना ६,५५५ बस पुरवठ्यासाठी वर्क ऑर्डर दिल्या. मात्र, त्यांच्याकडून वेळेत बस उपलब्ध न झाल्याने अपेक्षित बस सेवा वाढवता आली नाही. स्क्रॅपिंग पॉलिसीनुसार बस स्क्रॅप केल्या जात असल्याने बेस्ट बसेसची संख्या कमी झाली आहे. पूर्वी बेस्टच्या मालकीच्या असलेल्या १,८८२ बसेसपैकी सध्या २४९ बसेस आहेत, तर भाडेतत्त्वावरील २,५५८ बस उपलब्ध असल्याची माहिती राज्यमंत्री मिसाळ यांनी दिली.