"एक तिकीट मिळाले नाही म्हणून...", संतोष धुरींवर राज ठाकरेंचा नेता संतापला, किल्लेदार काय बोलले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 13:46 IST2026-01-06T13:42:37+5:302026-01-06T13:46:28+5:30
BMC Election 2026: महापालिका निवडणूक काही दिवसांवर असताना वरळीमध्येच उद्धवसेना-मनसे युतीला झटका बसला. मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी अचानक पक्षाला जय महाराष्ट्र केला.

"एक तिकीट मिळाले नाही म्हणून...", संतोष धुरींवर राज ठाकरेंचा नेता संतापला, किल्लेदार काय बोलले?
मुंबई महापालिका निवडणूक यावेळी प्रतिष्ठेची ठरताना दिसत आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र लढत आहेत. तर दुसरीकडे शिंदेसेनेला सोबत घेत भाजपानेही निवडणुकीत झोकून दिले आहे. दोन्ही पक्षांकडून प्रत्येक प्रभागात लक्ष दिले जात असताना मनसे-उद्धवसेना युतीला वरळीतच धक्का बसला. माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी मनसे सोडली. त्यांच्या या निर्णयानंतर मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी संताप व्यक्त करत धुरी यांना स्वार्थी म्हटले आहे.
मराठी मतदार असलेल्या वरळी भागातच मनसेला झटका बसला. माजी नगरसेवक आणि आतापर्यंत राज ठाकरे यांच्यासोबत असलेले संतोष धुरी यांनी पक्ष सोडला. संतोष धुरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी कॅबिनेट मंत्री नितेश राणेही सोबत होते. ५ जानेवारी रोजी रात्री उशिरा ही भेट झाली. त्यानंतर ६ जानेवारी रोजी त्यांनी भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.
यशवंत किल्लेदार संतोष धुरींना काय म्हणाले?
संतोष धुरी यांनी पक्षाला राम राम केल्यानंतर मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी टीकास्त्र डागले. "पक्षाने आतापर्यंत संतोष धुरी यांना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या. त्यांच्यावर विश्वास टाकला. आता केवळ एक तिकीट मिळाले नाही म्हणून त्यांनी पक्षाची साथ सोडणे, हे त्यांच्या स्वार्थी मानसिकतेचे दर्शन घडवते", अशी टीका यशवंत किल्लेदार यांनी केली.
संतोष धुरींनी मनसे का सोडली?
मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धवसेना आणि मनसे युतीत लढत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मनसेतून इच्छुक असलेल्या उमेदवारांचे प्रभाग उद्धवसेनेकडे गेले आहेत. वरळीतील वार्ड क्रमांक १९४ मधून संतोष धुरी हे निवडणूक लढवण्यास इच्छुक होते.
युतीत हा प्रभाग उद्धवसेनेकडे गेला. या प्रभागातून उद्धवसेनेने निशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे संतोष धुरी नाराज झाले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची समजून घालण्याचा प्रयत्नही केला. मात्र, तरीही धुरी यांनी पुढचा निर्णय घेतला.
नाराज संतोष धुरी यांच्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. ५ जानेवारी रोजी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. १५ जानेवारीला मतदान असताना धुरींनी पक्ष सोडल्याने उद्धवसेना-मनसे युतीला हा धक्का मानला जात आहे.