"परप्रांतीय माणसाकडून जी मारहाण झाली..."; कल्याण प्रकरणावरुन मनसेच्या अविनाश जाधवांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 14:01 IST2024-12-20T14:01:01+5:302024-12-20T14:01:35+5:30
कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबाला परप्रांतीयांकडून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे, यावरुन आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. मनसेच्या अविनाश जाधव यांनी इशारा दिला आहे.

"परप्रांतीय माणसाकडून जी मारहाण झाली..."; कल्याण प्रकरणावरुन मनसेच्या अविनाश जाधवांचा इशारा
कल्याणमध्ये काल मराठी कुटुंबाला परप्रांतीयांकडून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणावरुन आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, आता मनसेच्याअविनाश जाधव यांनीही इशारा दिला आहे. तर मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी या प्रकरणावरुन कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना फटकारले आहे. मुंबईत मराठी माणसावर होणारा अन्याय कदापी सहन केला जाणार नाही. कल्याणमधील घटन दुर्देवी आहे, मुळात ही घटना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातील आहे. या घटनेवर त्यांनी अजूनही शब्द काढलेला नाही, असा निशाणा अविनाश अभ्यंकर यांनी साधला.
'आमच्या पोरांनी न्याय दिला, तर पोलिसांनी मध्ये यायचं नाही'; कल्याण प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंचा इशारा
मनसे नेते अविनाश जाधव यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली. अविनाश जाधव म्हणाले, काल कल्याणला झाले. याआधी नालासोपारामध्ये अशी घटना घडली होती. या सगळ्या लोकांना निवडणुकीनंतर माज आला आहे. यांचा माज आता उतरण्याची आता गरज आहे. जरी मराठी माणूस मनसेसोबत राहिला नसेल तरी मराठी माणसासोबत मनसे नेहमी आहे. यापुढे अशी कोणतीही घटना घडली तर मनसे उत्तर देईल, असंही अविनाश जाधव म्हणाले.
"कालच्या घटनेनंतर मनसे सैनिक तयारी होते. सरकारने या घटनेत हस्तक्षेप केला पाहिजे. नवीन सरकार आल्यापासून या घटना वाढल्या आहेत. या घटना थांबल्या नाहीत तर महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या रागाला सामोरे जावे लागेल, असंही जाधव म्हणाले. असे हल्ले होत असतील तर आम्ही कायदा हातात घेतला तर आमचे काय चुकले? असंही ते म्हणाले. तुम्ही आम्हाला झाडू मारायला ठेवणार असाल तर राज साहेबांनी या सगळ्यांवर झाडू मारला तर काय चुकते. त्यावेळी आपल्याकडील नेते बोलतात. आता हे नेते कुठे आहेत. ते काहीच बोलत नाही, त्यांची ही व्होट बँक आहे. आम्ही कायदा हातात घेतला तर आमच्यावर गुन्हे दाखल करु नका, असंही अविनाश जाधव म्हणाले.
" कल्याणमध्ये मराठी माणसाला जी अर्वाच्च शिवीगाळ करत, परप्रांतीय माणसाकडूनजी मारहाण झाली, त्याच्यावर वेळेत सरकारने कारवाई करावी अन्यथा मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने कारवाई केली तर मग म्हणू नका की मनसेने कायदा हातात घेतला. आणि विधानसभेचं अधिवेशन सुरु असताना, या… pic.twitter.com/EoFCr8UjMa
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) December 20, 2024