सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 14:15 IST2025-07-20T14:15:18+5:302025-07-20T14:15:33+5:30
पावसाळ्यात घराच्या आजूबाजूला अडगळीच्या ठिकाणी साप आढळतात. या दिवसांत त्यांचा प्रजनन कालावधी असतो.

सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?
मुंबई : पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. सर्पदंश झालेल्या व्यक्तीस मोकळ्या, स्वच्छ जागी हलवणे, त्याला दिलासा देणे आवश्यक आहे. अनेकदा बिनविषारी सापाने दंश केलेला असतो. त्यामुळे केवळ भयाने आणि अंधश्रद्धेमुळे रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो. दुसरीकडे सर्पदंश होऊ नये, म्हणून नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी, तसेच सर्पदंश झाल्यास योग्य औषधोपचार घ्यावेत, असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.
पावसाळ्यात घराच्या आजूबाजूला अडगळीच्या ठिकाणी साप आढळतात. या दिवसांत त्यांचा प्रजनन कालावधी असतो. बिळात, जमिनीतील तडे, पोकळ भागात पावसाचे पाणी साचल्याने सर्प बाहेर पडतात व इतरत्र ठिकाणी नवीन आसरा शोधतात. नागरिकांनी घाबरून न जाता सर्पमित्रांना मदतीसाठी बोलवावे. सापाला मारणे, साप बाळगणे, व्यापार करणे किंवा सापांचे प्रदर्शन करणे हा वन्यजीव कायद्याने गुन्हा आहे. सापांबरोबर स्टंट करण्याचा प्रयत्न करू नये. आजूबाजूला साप दिसल्यास सर्पमित्ररांशी संपर्क साधावा. घोणस व फुरसे साप चावल्यास अवळपट्टी किंवा बँडेज बांधू नये. सर्पदंश झालेल्या व्यक्तीस रुग्णालयात लवकर उपचारासाठी दाखल करावे.
घराच्या परिसरात सरपण, अडगळ ठेवू नका
घराच्या परिसरात सापाचा वावर टाळण्यासाठी उंदर व पालींची संख्या वाढू देऊ नका. सरपण, अडगळ, कचरा, दगड विटांचा ढीग घराच्या आजूबाजूला ठेऊ नये, आजूबाजूला तण व गवत ठेवू नका. घराच्या आसपास पाणी साचू देऊ नये. त्या पाण्यात बेडकांचा वावर असल्यास साप अन्नाच्या शोधात येऊ शकतो.
... या चुका कटाक्षाने टाळाव्यात
> तोंडाने विष ओढण्याचा प्रकार करू नये.साप मारून रुग्णालयात घेऊन जाऊ नये.
> सुरक्षितपणे शक्य असल्यास फोटो काढून सर्पमित्र अथवा डॉक्टरांना दाखवा.
> सर्पदंश झालेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे काप, चिरा जखमेवर घेऊ नये.
> रुग्णास मांत्रिकाकडे अथवा मंदिरात नेऊ नका.
> मिरच्या अथवा कडू लिंबाचा पाला रुग्णास खायला देऊ नये.
> पावसाळ्यात जमिनीवर झोपू नये, घरातील व भिंतीतील तडे बुजवा, सांडपाण्याच्या पाइपला जाळी बसवा.
दंश झाल्यास काय कराल ?
> सर्पदंश झालेली जखम पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावी.
> साप चावलेल्या व्यक्तीस मानसिक आधार द्यावा.
> नाग व मण्यार साप हाताला किंवा पायाला चावल्यास मनगटाला किंवा मांडीला अवळपट्टी बांधावी.
> बांधलेली अवळपट्टी दर १० मिनिटांनी सैल करत राहावी.