लग्नाच्या शुटिंगसाठी ड्रोन वापरणार असाल तर सावधान; नियमावली कठोर करण्याचा केंद्राचा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:07 AM2021-07-27T04:07:10+5:302021-07-27T09:02:14+5:30

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने ड्रोन विक्री आणि उडवण्याबाबत नियम आखून दिले आहेत. वेगवेगळ्या श्रेणीनुसार ड्रोनबाबत स्वतंत्र नियमावली तयार करण्यात आली आहे.

Be careful if you are going to use a drone for wedding shooting; tightening the rules by Centre | लग्नाच्या शुटिंगसाठी ड्रोन वापरणार असाल तर सावधान; नियमावली कठोर करण्याचा केंद्राचा विचार

लग्नाच्या शुटिंगसाठी ड्रोन वापरणार असाल तर सावधान; नियमावली कठोर करण्याचा केंद्राचा विचार

googlenewsNext
ठळक मुद्दे मुंबईसारख्या शहरात परवानगीशिवाय ड्रोन उडवता येत नाही.२५० ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या ड्रोनसाठी परवान्याची आवश्यकता नसते. लग्न किंवा प्री-वेडिंग शुटिंगसाठी दिवसाला १० हजार रुपये ड्रोनमालक भाडे आकारतात.

मुंबई : लग्न, प्री-वेडिंग शुटिंग किंवा पर्यटनस्थळांचे विहंगम दृश्य कॅमेऱ्यात टिपण्यासाठी अलीकडे ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांत लष्करी तळांवर पाकिस्तानी ड्रोन घिरट्या घालताना आढळून आल्याने ड्रोन उड्डाणांबाबत नियमावली कठोर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी दंडात्मक तरतूदही करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही जर लग्नाचे शुटिंग किंवा अन्य कारणांसाठी ड्रोन वापरणार असाल तर सावधगिरी बाळगा.

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने ड्रोन विक्री आणि उडवण्याबाबत नियम आखून दिले आहेत. वेगवेगळ्या श्रेणीनुसार ड्रोनबाबत स्वतंत्र नियमावली तयार करण्यात आली आहे. मुंबईसारख्या शहरात परवानगीशिवाय ड्रोन उडवता येत नाही. त्यासाठी पोलिसांकडे रितसर अर्ज करावा लागतो. संबंधित व्यक्तीची संपूर्ण माहिती, कोणत्या कारणासाठी आणि किती कालावधीसाठी ड्रोन उडविण्यात येणार आहे याची माहिती पोलिसांना द्यावी लागते. त्यानंतर उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडून परवानगीबाबत निर्णय घेतला जातो.

ड्रोन वापरण्याचेही नियम

- २५० ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या ड्रोनसाठी परवान्याची आवश्यकता नसते. व्यावसायिक किंवा करमणुकीच्या उद्देशाने २५० ग्रॅम ते २५ किलोग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या ड्रोन उड्डाणासाठी यूएएस ऑपरेटर परमिट – १आय (यूएओपी-१) हा परवाना आवश्यक आहे. तसा परवाना असल्यास मर्यादित उंची आणि क्षेत्रामध्ये ड्रोन उडविण्यास परवानगी दिली जाते.

- वजनदार वस्तू किंवा ड्रोनद्वारे डिलिव्हरी करण्यासाठी २५ किलोपेक्षा अधिक वजनाच्या ड्रोनला यूएएस ऑपरेटर परमिट – २ (यूएओपी-२) हा परवाना लागतो. डीजीसीए आणि हवाई संरक्षण नियंत्रणाकडून पूर्वपरवानगी आवश्यक असते.

- कोणताही मायक्रो ड्रोन जमिनीपासून ६० मीटर उंचीपेक्षा अधिक आणि कमाल २५ मीटर प्रतिसेकंदांपेक्षा अधिक वेगाने उड्डाण करू शकत नाही. कोणताही लहान ड्रोन १२० मीटर उंची आणि २५ मीटर प्रतिसेकंदांपेक्षा अधिक वेगाने उडविता येत नाही.

- डीजीसीएने जारी केलेल्या परवान्यामध्ये नमूद अटींनुसार मध्यम किंवा मोठ्या आकाराचे ड्रोन उड्डाण करू शकतात. प्रतिबंधित भागांत पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन उडवता येत नाही.

ड्रोन उडविण्यासाठी परवाना हवा

- ड्रोन उडविण्यासाठी परवाना बंधनकारक आहे. त्यासाठी संबंधित व्यक्ती दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. डीजीसीएच्या नियमानुसार वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

- प्रशिक्षण आणि रिमोट पायलट परवान्यांसाठी अर्ज करण्याचे किमान वय १८, तर कमाल वय ६५ वर्षे आहे.

- कोणत्याही नागरी, खासगी किंवा संरक्षण विमानतळांचा तीन किमी परिसर, आंतरराष्ट्रीय सीमेपासूनच्या २५ किमी अंतरात ड्रोन उडवता येत नाही.

एका शुटिंगचा खर्च १० ते ३० हजार

- लग्न किंवा प्री-वेडिंग शुटिंगसाठी दिवसाला १० हजार रुपये ड्रोनमालक भाडे आकारतात.

- शुटिंग लांबणार असल्यास ३० हजारांपर्यंत पॅकेज ठरविले जाते.

- चित्रपट किंवा मालिकांसाठी ड्रोनचे भाडे आठवडा किंवा पंधरवडा या तत्त्वावर ठरते.

ड्रोनबाबत काटेकोर नियमावली केल्यापासून विक्रेत्यांनी धास्ती घेतली आहे. शिवाय ड्रोन उडविण्यास परवानगी मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याने अवैध विक्रीलाही आळा बसला आहे.

- सौरभ भाट्टीकर, ड्रोनमालक

Web Title: Be careful if you are going to use a drone for wedding shooting; tightening the rules by Centre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस