Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाप रे... मनसेच्या वसंत मोरेंना संभाजीराजेंचा फोन? लवकरच भेटीचं नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 15:01 IST

ती पोस्ट वाचून माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनी फोन करुन त्यांची समजूत काढली. 

मुंबई - राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला असून शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली आहे. शरद पवार विरुद्ध अजित पवार असे दोन गट पक्षात पडल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे राज्याचं राजकारण अनिश्चित झालं असून कोण कधी कोणासोबत युती किंवा आघाडी करेल याचा नेम नाही. त्यामुळे, अजित पवार यांनी भाजपासोबत जाऊन सत्ता स्थापन केल्यानंतर, सोशल मीडियातून तीव्र संतापाची भावना व्यक्त झाली. मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी फेसबुकवरुन एक पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या होत्या. मात्र, ती पोस्ट वाचून माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनी फोन करुन त्यांची समजूत काढली. 

"पार पार राजकारणावरचा विश्वास उडालाय राव... लांब कुठं तरी जंगलात जाऊन शेती करत बसावं असे वाटतंय", अशी फेसबुक पोस्ट वसंत मोरेंनी केली होती. त्यासंदर्भात समजताच स्वराज्य संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार संभाजीराजे यांनी वसंत मोरे यांना फोन करुन संवाद साधला. वसंत मोरेंच्या कामाचं कौतुक करताना, तुमच्यासारख्या माणसांनी राजकारणात राहायला हवा, आपल्याला समाजाची सेवा करायची आहे. त्यामुळे, तसा विचार मनात आणू नका, असे म्हणत संभाजीराजेंनी वसंत मोरेंची समजूत काढली.

पाहा व्हिडिओ - https://www.facebook.com/reel/1247022845986560

तुम्ही चांगलं काम करताय, तुमच्यासारख्या व्यक्तीने असा विचार करायचा नाही. याउलट आता आपली जबाबदारी अधिक वाढलीय. आम्हाला तरी हे आवडलय का?, असे म्हणत संभाजीराजेंनी वसंत मोरेंना राजकारण न सोडण्याचा सल्ला दिलाय.

छत्रपती संभाजीराजेंचा फोन आल्याने वसंत मोरे यांनाही आश्चर्य वाटलं, संभाजीराजे मला बोलणार आहेत?, बाप रे.. असा प्रतिसाद मोरे यांनी या कॉलला दिला होता. तसेच, दोघांचं बोलणं झाल्यानंतर लवकरच आपण भेटू असं आश्वासनही संभाजीराजे यांनी वसंत मोरेंना दिलं. 

टॅग्स :संभाजी राजे छत्रपतीमनसेपुणेमुंबईअजित पवार