Mumbai: वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टी, उद्धवसेनेची सरकारवर टीका; अमित ठाकरेंच्या हस्ते नेरूळच्या शिवसृष्टीचे उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 07:49 IST2025-11-17T07:48:13+5:302025-11-17T07:49:44+5:30
Bandra Fort Liquor Party: मुंबईतील ऐतिहासिक वांद्रे किल्ल्यावर शनिवारी मध्यरात्रीनंतर दारू पार्टी झाल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय वातावरण तापले.

Mumbai: वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टी, उद्धवसेनेची सरकारवर टीका; अमित ठाकरेंच्या हस्ते नेरूळच्या शिवसृष्टीचे उद्घाटन
मुंबईतील ऐतिहासिक वांद्रे किल्ल्यावर शनिवारी मध्यरात्रीनंतर दारू पार्टी झाल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय वातावरण तापले. उद्धवसेनेने यावरून महायुती सरकार, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि मुंबई महापालिकेच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर नवी मुंबईत चार महिन्यापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या नेरूळच्या शिवसृष्टीचे उद्घाटन मनसे नेते अमित ठाकरे यांनी करून राजकीय खळबळ उडवली. लोकांच्या समस्यांपेक्षा याच गोष्टींनी रविवारी राजकीय धुराळा उडवला.
भाजप- शिंदेसेनेत अगोदरच शिवसृष्टीवरून छुपी चढाओढ सुरू असतानाच मनसेने उद्घाटनाची बाजी मारली. त्यावरून भाजप व मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खटके उडाले. तर मुंबईत वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टीला परवानगी कशी दिली गेली, असा सवाल उद्धव सेनेचे अखिल चित्रे यांनी तीव्र आक्षेप घेतला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून झाल्याचा दावा करत हे सरकारच्या दुर्लक्षाचे उदाहरण असल्याचा आरोप त्यांनी केला.
पोर्तुगीजांनी बांधलेल्या व ब्रिटिश व मराठा साम्राज्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या हेरिटेज वास्तू असलेल्या वांद्रे किल्ल्यावर दारूची पार्टी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि महापालिका परवानगी देतेच कशी? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. पोर्तुगीजांनी १७ व्या शतकात बांधलेला, 'कॅस्टेला डी अगुआडा' म्हणून ओळखला जाणारा वांद्रे किल्ला हे मुंबईचे सांस्कृतिक वारसास्थळ आहे.