Join us  

सुटी सिगारेट अन् बिडीच्या विक्रीवर राज्यात बंदी; ठाकरे सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

By मुकेश चव्हाण | Published: September 26, 2020 10:03 AM

राज्यभरात आता कुठेही सुटी सिगरेट आणि बिडी विकायला बंदी घातली आहे.

मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात शुक्रवारी १७ हजार ७९४ नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाल्याने एकूण रूग्णसंख्या १३ लाख ७५७ झाली. तर, सध्या २ लाख ७२ हजार ७७५ सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना राज्य सरकारने आरोग्याच्या दृष्टीनं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानूसार, राज्यभरात आता कुठेही सुटी सिगरेट आणि बिडी विकायला बंदी घातली आहे. यापुढे सिगारेट व बिडी ओढायचीच असेल तर संपूर्ण पाकिट आणि बिडी बंडल विकत घ्यावे लागणार आहे. व्यसनांकडे वळलेल्या तरुणाईला रोखण्यासाठी हा आदेश काढल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. तसेच या आदेशाची कठोर अंमजबजावणी करण्याचे आदेश देखील सरकारने पोलीस आणि महापालिकेला दिले आहे.

सिगारेट पाकिट अथवा बिडी बंडलाची विक्री केल्यास कायद्यात अपेक्षित असलेला उद्देश म्हणजे 'आरोग्याच्या धोक्याची कल्पना' हा साध्य होतो. मात्र तेच सुटी म्हणजे सिगारेटच्या पाकिटातून एकेक सिगारेट काढून विकल्यास ग्राहकाला धोक्याची कल्पना कायद्याच्या अर्थाप्रमाणे मिळत नाही. आरोग्य विभागाचे हे म्हणणे विधी व न्याय विभागाने आता करोनाच्या पार्श्वभूमीवर मान्य केले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ई- सिगारेटवरही केंद्र सरकारने घातली आहे बंदी-

केंद्र सरकारने याआधी 'ई-सिगारेट'चे उत्पादन आणि विक्रीवर बंदी घातली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 19 सप्टेंबर 2019 रोजी या निर्णयाची घोषणा केली होती. धूम्रपान रोखण्यासाठीचा पर्याय म्हणून 'ई-सिगारेट'कडे पाहिले जात होते; परंतु, त्यात अपयश आल्याने बंदीचा निर्णय घेण्यात आला होता.

राज्यात कोरोनामुळे होणारा मृत्युदर २.६७ टक्के-

राज्यात सध्या कोरोनामुळे होणारा मृत्युदर २.६७ टक्के आहे. शुक्रवारी दिवसभरात ४१६ मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंत ३४,७६१ जणांचा मृत्यू झाला. तसेच गेले काही दिवस दररोज दोन हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने मुंबईत भीतीचे वातावरण होते. मात्र, शुक्रवारी रुग्ण संख्येत घट झाली असून, दिवसभरात १,८६३ बाधितांचे निदान झाले. रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर १.११ टक्क्यांवर आला आहे. गुरुवारी २,१६३ रुग्ण आढळले होते. शुक्रवारी १,१६९ रुग्ण बरे झाले. यामुळे आतापर्यंत ८१ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर दिवसभरात ४८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा ८,७०३ झाला आहे. 

पालिकेच्या अहवालानुसार, सध्या २८ हजार २७३ सक्रिय रुग्ण आहेत, तर आतापर्यंत एक लाख ५६ हजार ८०७ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण बाधितांचा आकडा एक लाख ९४ हजार १७७ एवढा आहे, तर आतापर्यंत दहा लाख ५७ हजार ६४० चाचण्या करण्यात आल्या.

अन्य महत्वाच्या बातम्या-

कंगना भाजपात प्रवेश करणार?; देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं विधान

'...तर मला काय फरक पडतो, माझे दोन नंबरचे कोणतेही काम नाही'; देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

टॅग्स :सिगारेटउद्धव ठाकरेआरोग्यमहाराष्ट्रमहाराष्ट्र सरकारमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस