कोळशावरील बेकऱ्यांना टाळेच! नोटिसा देण्यास सुरुवात; स्वच्छ इंधनच वापरावे लागणार

By सीमा महांगडे | Updated: September 10, 2025 14:43 IST2025-09-10T14:42:48+5:302025-09-10T14:43:43+5:30

कोळशावरील बेकऱ्यांचे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर ९ जानेवारीला न्यायालयाने आदेश देत ९ जुलैपर्यंत स्वच्छ इंधनात रूपांतर करण्याचे आदेश दिले.

Ban coal-fired bakeries! Notices started being issued; Only clean fuel will have to be used | कोळशावरील बेकऱ्यांना टाळेच! नोटिसा देण्यास सुरुवात; स्वच्छ इंधनच वापरावे लागणार

कोळशावरील बेकऱ्यांना टाळेच! नोटिसा देण्यास सुरुवात; स्वच्छ इंधनच वापरावे लागणार

- सीमा महांगडे, मुंबई 
बेकरीमालकांनी स्वच्छ आणि हरित इंधनाचा पर्याय निवडण्याकडे दुर्लक्ष केल्याने शहरातील ५९२ पैकी २९५ बेकऱ्यांवर लवकरच कारवाईची कुऱ्हाड कोसळणार आहे. यासंदर्भात मुंबई महापालिकेकडून अधिकाऱ्यांना पुढील कारवाईचे निर्देश देण्यात आल्याची माहिती पर्यावरण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. गणेशोत्सवादरम्यान आरोग्य अधिकारी व्यस्त होते. गणेशोत्सवानंतर आता कारवाई केली जाणार आहे.

कोळशावरील बेकऱ्यांचे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर ९ जानेवारीला न्यायालयाने आदेश देत ९ जुलैपर्यंत स्वच्छ इंधनात रूपांतर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर दोन वेळा मुदवाढ देऊनही २२ ऑगस्टला झालेल्या सुनावणीत बेकरी मालकांनी मुदतवाढ मागितली. मात्र, न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे महापालिका आता बेकऱ्यांवर कारवाई करणार आहे. मुंबईत ५९२ बेकऱ्या असून २९७ बेकऱ्यांचे स्वच्छ इंधनात रूपांतर करण्यात आले आहे. उर्वरित बेकरी मालकांनी अद्यापही स्वच्छ इंधनात रूपांतर केले नाही.

हॉटेल मालकांनाही नोटीस?

महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून हॉटेलांच्या हद्दीत विविध तंदूर खाद्यपदार्थ बनवून प्रदूषण करणाऱ्या हॉटेल मालकांनाही नोटीस बजावली जात आहे.

तंदूर बंद करण्याशिवाय पर्याय नसेल, असे महापालिकेने स्पष्ट २ केले होते. मात्र, ही कारवाई तितक्या कठोरतेने झाली नसल्याची टीका पालिकेवर होत आहे.

'ते' महापालिकेच्या रडारवर

२९५ पैकी ४२ बेकऱ्यांनी पीएनबी जोडणीसाठी अर्ज केले आहेत. तर, दोन बेकऱ्यांनी सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांचे औपचारिकीकरण योजनेअंतर्गत ३५ टक्के सबसिडीसाठी अर्ज केला आहे. यांना वगळून बाकी बेकरीमालक सध्या महापालिकेच्या रडारवर आहेत. या कारवाईत बेकऱ्या स्वच्छ इंधनात रूपांतरित होईपर्यंत बेकरी मालकांना बंद ठेवाव्या लागणार आहेत.

स्वच्छ इंधनाचा वापर टाळणाऱ्या बेकऱ्यांवर न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार कारवाई केली जाईल. याबाबतच्या नोटिसा तयार आहेत. -अविनाश काटे, उपआयुक्त, पर्यावरण व वातावरणीय बदल
 

 

Web Title: Ban coal-fired bakeries! Notices started being issued; Only clean fuel will have to be used

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.