Balasaheb Thackeray road accident insurance scheme approved by ministry of maharashtra | आनंदाची बातमी, बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेस मंजुरी

आनंदाची बातमी, बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेस मंजुरी

ठळक मुद्देअपघातग्रस्त व्यक्तीला ताबडतोब उपचार मिळाल्यास त्याचा जीव वाचू शकतो, तसेच त्याच्या अपघातावरचा खर्च दिल्यास, त्याला दिलासा मिळू शकतो. आरोग्य विभागाच्या माध्यमातून अपघातग्रस्त व्यक्तींना विम्याचा लाभ देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना पुन्हा कार्यान

मुंबई - रस्ते अपघातातील जखमींवर तातडीने उपचार व्हावेत, यासाठी बाळासाहेब ठाकरेअपघात विमा योजना सुरू करण्यात आली असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील तत्कालीन शिवसेना-भाजपच्या सरकारच्या कार्यकाळातील ही योजना आहे. तब्बल 5 वर्षांनी अखेर या योजनेला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे, युती सरकारच्या काळापासून प्रतिक्षेत असलेली ही योजना आता कार्यान्वित होत आहे. 

अपघातग्रस्त व्यक्तीला ताबडतोब उपचार मिळाल्यास त्याचा जीव वाचू शकतो, तसेच त्याच्या अपघातावरचा खर्च दिल्यास, त्याला दिलासा मिळू शकतो. आरोग्य विभागाच्या माध्यमातून अपघातग्रस्त व्यक्तींना विम्याचा लाभ देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत अपघातग्रस्त व्यक्तीला ३0 हजार रुपयापर्यंतच्या उपचाराचा खर्च शासनाकडून मोफत करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील कुठल्याही नागरिकाला राज्यात अपघात झाल्यास, त्याला मदत मिळणार आहे.

तत्कालीन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी २०१५ च्या अखेरीस बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेची घोषणा केली होती. महाराष्ट्रातील कोणत्याही रस्त्यावर कोणालाही अपघात झाल्यास बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेअंतर्गत ७२ तास मोफत औषधोपचार किंवा ३० हजार रुपये देण्याची घोषणा युतीच्या काळातील आरोग्यमंत्री व शिवसेना नेते दीपक सावंत यांनी केली होती. त्या, योजनेला महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजुरी मिळाली आहे. रस्ते अपघातातील जखमींचा जीव वाचवा यासाठी या योजनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. यात 74 वेगवेगळ्या अपघाताचा समावेश करण्यात येईल. या योजनेसाठी 125 कोटी खर्च अपेक्षित असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे

रुग्णांना 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून वा खासगी रुग्णवाहिकेतून नजीकच्या रुग्णालयात दाखल केले जाईल.

-रुग्णालयात (कॅशलेस हॉस्पिटलायझेशन) तात्काळ दाखल करण्याची सोय.

-अपघातातील रुग्णावर तीन दिवसांपर्यंत रुग्णालयात उपचार.

-रुग्णाला घरी वा अन्य रुग्णालयात रुग्णवाहिकेतून पोहोचविण्याची जबाबदारी.

-यासाठी एक हजार रुपयांपर्यंत रुग्णवाहिकेचा खर्चही सरकार करेल.

-30 हजार रुपयांच्या विमा संरक्षणांतर्गत जखमीला रुग्णालयात दाखल करणे, नर्सिग, शस्त्रक्रिया, वैद्यकीय सल्ल्याचा खर्च तसेच रक्त व ऑक्सिजन पुरवठय़ाचा खर्च.

- योजनेच्या लाभासाठी वयाची अट नाही.

स्वत:ला जाणीवपूर्वक जखमी करून घेतलेली व्यक्ती, दारूच्या अमलाखालील व्यक्ती अथवा राज्याबाहेर जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी विमा संरक्षण मिळणार नाही. या योजनेसाठी किती विमा प्रीमियम भरला जाणार आहे हे अद्याप निश्चित झाले नसले तरी जखमी व्यक्तीवरील उपचारासाठी 30 हजार रुपये खर्च करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Balasaheb Thackeray road accident insurance scheme approved by ministry of maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.