Ashok Chavan: 'अरबी समुद्रातील स्मारक लवकरच उभारण्याची राज्य सरकारची भूमिका'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 12:06 IST2022-03-22T11:54:48+5:302022-03-22T12:06:31+5:30
पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने अरबी समुद्रात स्मारक उभारण्याच्या कामाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

Ashok Chavan: 'अरबी समुद्रातील स्मारक लवकरच उभारण्याची राज्य सरकारची भूमिका'
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, ही शासनाची भूमिका असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभेत सांगितले. कृषी, पदुम, शालेय शिक्षण व क्रीडा, वित्त, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मंत्री चव्हाण बोलत होते.
पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने अरबी समुद्रात स्मारक उभारण्याच्या कामाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या स्मारकाबाबत काही न्यायालयीन प्रकरणे आहेत. तसेच पर्यावरण विभागाकडूनही काही अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे हे काम पूर्णत्वास नेण्यात अडथळे येत असून छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक लवकरात लवकर व्हावे, ही शासनाची भूमिका आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, दरवर्षी प्रमाणे रस्ते विकासाच्या कामांची मोठ्या प्रमाणात मागणी होती. मात्र, मागच्या काळात कोरोना महामारीमुळे राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता जुनी विकासकामे हाती घेवून ती पूर्णत्वास नेण्याची गरज आहे. तसेच आशिया विकास बँकेच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीतून राज्यातील विविध रस्त्यांची कामे सुरु आहेत. पहिल्या टप्प्यातील 31 कामे प्रगतीपथावर असून 18 कामे निविदा प्रक्रियेत आहेत. यात ज्या भागात जास्त वाहतूक आहे त्या भागात रस्त्याची कामे केली जात आहेत. तसेच राज्यातील ज्या भागात खनिकर्माच्या कामांमुळे अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते, त्या भागात डांबरी रस्त्यांऐवजी सिमेंट रस्ते निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याप्रमाणे कामे सुरु आहेत.