मुंबई - भाजपा आमदार आशिष शेलार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाविकास आघाडीच्या भवितव्यावरून जोरदार जुगलबंदी रंगली आहे. सत्तेतील दोन पक्षांकडून मिळत असलेल्या संकेतांनुसार राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागू शकतात, असा दावा आशिष शेलार यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसने आशिष शेलार यांचे हे विधान म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने असल्याचे म्हटले आहे. (Ashish Shelar's statement is 'Mungerilal Ke Haseen Sapne', NCP's scathing criticism)
सत्तेतील तीन पक्षांमध्ये असलेला विसंवाद आणि त्यापैकी दोन पक्षांकडून मिळत असलेले संकेत पाहता राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागू शकतात. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तयार राहावं, असं विधान भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनं केलं होतं. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आशिष शेलारांना प्रत्युत्तर देताना केलेल्या ट्विटमध्ये क्लाईड क्रास्टो म्हणाले की, आपले स्वतःचे भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते पळून जाणार या भीतीपोटी, आशिष शेलार त्यांना रोखण्याकरीता 'मुंगेरीलाल के हसीन सपने' दाखवत आहेत.
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता काही महिन्यांवर आली आहे. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीमधील घटकपक्ष आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या स्थैर्यावरूनही वेगवेगळे दावे केले जात आहेत.