Shiv Sena UBT MNS Alliance: "तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 15:06 IST2025-12-24T15:05:02+5:302025-12-24T15:06:44+5:30
Ashish Shelar: उद्धवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात झालेल्या ऐतिहासिक युतीवर भाजपने जोरदार पलटवार केला.

Shiv Sena UBT MNS Alliance: "तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
उद्धवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात झालेल्या ऐतिहासिक युतीवर भाजपने जोरदार पलटवार केला. भाजप नेते आशिष शेलार यांनी या युतीचे स्वागत करताना ठाकरे बंधूंना त्यांच्या भूतकाळातील विधानांची आठवण करून देत अनेक बोचरे प्रश्न उपस्थित केले. ही युती मराठी अस्मितेसाठी नसून केवळ अस्तित्वाच्या भीतीपोटी झाल्याचा दावा शेलार यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, "कोणत्याही मराठी माणसाने हे दोन भाऊ किंवा दोन पक्ष वेगळे व्हावेत म्हणून आंदोलन केले नव्हते. मग तुम्ही आधी वेगळे का झालात? याचे उत्तर जनतेला मिळायला हवे. राज ठाकरेंनी एकेकाळी विधान केले होते की, 'मातोश्रीच्या माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे' आणि 'चार कारकुणांनी पक्षाचा ताबा घेतला आहे'. मग आता अचानक त्या बडव्यांशी आणि कारकुणांशी घरोबा कसा झाला? ही गळाभेट कशासाठी?", असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
राज ठाकरेंच्या गाजलेल्या लाव रे तो व्हिडिओ या शैलीचा संदर्भ देत शेलार यांनी इशारा दिला. ते म्हणाले की, "ज्यांना 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणण्याची सवय आहे, त्यांना सांगू इच्छितो की तुमच्या भाषणांचे असंख्य व्हिडिओ आमच्याकडेही आहेत. आम्हीही ते व्हिडिओ लावून तुमच्या डोळ्यांत अंजन घालू. तुम्ही काहीही बोलाल आणि मुंबईकर ते मान्य करतील, असे समजू नका."
शेलार यांनी या युतीमागचे कारण स्पष्ट करताना सांगितले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला मुंबईकरांनी भरभरून आशीर्वाद दिला. या विकासकामांच्या यशामुळे हे दोन्ही पक्ष घाबरले आहेत. ही युती मराठी माणसाच्या अस्मितेसाठी नाही, तर स्वतःच्या पक्ष अस्तित्वासाठी आणि भीतीपोटी झालेली हातमिळवणी आहे."
आशिष शेलार यांनी राज ठाकरेंच्या काही विधानांचा समाचार घेत त्यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारले. "राज ठाकरे म्हणतात जागावाटप करणार नाही, मग एका भावाला दुसऱ्याला फसवायचे आहे की, अजूनही वादविवाद मिटलेले नाहीत? तुम्हाला नक्की कशाची भीती वाटतेय? राज ठाकरे 'मुले पळवणाऱ्या टोळी'बद्दल बोलत आहेत. पण २०१७ मध्ये मनसेचे नगरसेवक कोणी पळवले होते? राज ठाकरेंनी शेजारी बसलेल्या उद्धव ठाकरेंना विचारावे. त्यांनी नगरसेवक पळवणाऱ्या टोळीच्या म्होरक्यासोबत हातमिळवणी कशी केली?, असाही प्रश्न विचारला. शेलार यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत युती विरुद्ध महायुती असा सामना अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.