Join us
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी वारीबाबत फेरविचार करावा; देहू संस्थानचं राज्य सरकारला साकडं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 10:48 IST

आषाढी वारीबाबत सरकारने फेरविचार करावा असं साकडं देहू संस्थानने घातलं आहे.

मुंबई: महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने साजरा होणारा आषाढी वारी सोहळा (Pandharpur Wari 2021) यंदाही कोरोनाच्या संकटात असणार आहे. कारण, यंदा फक्त दहा मानाच्या पालख्यांनाच बसने जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी माहिती दिली. आषाढी वारी संदर्भात नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कॅबिनेट बैठकीत चर्चा करून वारी संदर्भात निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. 

गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी वारीचा सोहळा साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पायी वारीसाठी यंदाही परवानगी नाकारण्यात आली आहे. इतकंच नाहीतर पायी वारीवरून आता राजकारण करू नये असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील ज्या मनाच्या दहा महत्वाच्या पालखी आहेत त्यांनाच आषाढी वारीसाठी परवानगी देण्यात आली. या पालख्यांना बसमधून जाण्यासाठी २० बसेस देण्यात येणार असल्याचंही यावेळी अजित पवारांनी सांगितलं. मात्र राज्य सरकारने वारीबाबत फेरविचार करावा, अशी विनंती देहू संस्थानने केली आहे. 

आषाढी वारीबाबत सरकारने फेरविचार करावा असं साकडं देहू संस्थानने घातलं आहे. या संदर्भात आज देहू संस्थानची बैठक होणार आहे. त्यानंतर दहा देवस्थान एकमेकांशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

दरम्यान, हा मानाच्या पालख्यांपैकी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला, तसेच तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात प्रस्थानाला एकुण १०० लोकांना तर इतर पालख्यांमध्ये ५० जणांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर दोन्ही सोहळ्याचा एकुण ६० लोकांना बस ने पंढरपूर ला जाता येईल. वाखरीपर्यंत हा पालखी सोहळा बस ने जाईल तर पूजा गेल्या वेळ प्रमाणे होईल.  पूजेसाठी फक्त ५ जणांना परवानगी असेल. महाद्वार काल्याला यंदा परवानगी देण्यात आली आहे. तर रथोत्सव सध्या पद्धतीने होईल असे पवार यांनी सांगितले.

दहा मानाच्या पालख्यांची नावे:

१ -  संत निवृत्ती महाराज ( त्रंबकेश्वर )

२ -  संत ज्ञानेश्वर महाराज ( आळंदी )

३ -  संत सोपान काका महाराज ( सासवड ),

४ -  संत मुक्ताबाई ( मुक्ताईनगर )

५ -  संत तुकाराम महाराज ( देहू )

६ - संत नामदेव महाराज ( पंढरपूर )

७ - संत एकनाथ महाराज ( पैठण )

८ - रुक्मिणी माता ( कौडानेपूर -अमरावती )

९ - संत निळोबाराय ( पिंपळनेर - पारनेर अहमदनगर )

१० - संत चांगटेश्वर महाराज ( सासवड )

टॅग्स :आषाढी एकादशीपंढरपूरउद्धव ठाकरेमहाराष्ट्र सरकार