Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात सत्ताबदल होताच, केंद्राच्या योजनांना गती; प्रत्येक लाभार्थीस जाणार मुख्यमंत्र्यांचे पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 11:38 IST

घर घर तिरंगा, बूस्टर डोसला गती

मुंबई : केंद्र सरकारच्या आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून आलेल्या योजनांची गतिमान अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी एका बैठकीत दिले. राज्यातील अशा सर्व योजनांच्या लाभार्थींना यापुढे मुख्यमंत्र्यांच्या सहीचे पत्र पाठविले जाणार आहे.

मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी बैठकीच्या आयोजनाविषयी प्रास्ताविक केले तर उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी यांनी सादरीकरण केले. पंतप्रधान आवास योजनेची शहरांमध्ये केवळ १२ टक्केच अंमलबजावणी झाल्याबद्दल शिंदे - फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, प्रधानमंत्र्यांच्या भेटीस गेलो असता त्यांनी केंद्र राज्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे आपली जबाबदारी वाढली असून, अंमलबजावणीत कोणत्याही स्वरूपाच्या अडचणी आल्या तरी आपण त्या दूर करू.

पालक सचिवांनी गावात मुक्काम करावा

राज्यातील आकांक्षित जिल्ह्यांमधील एका गावात पालक सचिव व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट द्यावी, ग्रामस्थांशी संवाद साधावा, तिथे मुक्काम करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठी समन्वयाने मोहीम आखा, असेही निर्देश त्यांनी दिले. मोफत बूस्टर डोस मोहिमेस गती देण्यासही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मराठवाडा ग्रीडविषयी एक संपूर्ण सादरीकरण करा व केंद्र सरकारच्या योजनेत त्यातील काही घटक कसे समाविष्ट करून घेता येईल ते पाहा, अशी सूचना त्यांनी केली. प्रत्येक जिल्हा हा विशिष्ट उत्पादनासाठी ओळखला गेला पाहिजे. तो त्या जिल्ह्याचा ब्रँड व्हावा. तसेच त्याची निर्यात करणे, बाजारपेठ उपलब्ध करणे आदी बाबतीत नियोजन असले पाहिजे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :एकनाथ शिंदेमहाराष्ट्रभारत