'जाळपोळ अन् हिंसाचार थांबवा, सरकार आरक्षण देईल'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2018 15:40 IST2018-07-27T15:26:53+5:302018-07-27T15:40:54+5:30
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत मराठा आरक्षणावर चर्चा करण्यात आली असून राज्यातील हिंसाचार बंद व्हावा, अशी इच्छा मुख्यमंत्र्यांची आहे.

'जाळपोळ अन् हिंसाचार थांबवा, सरकार आरक्षण देईल'
मुंबई - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत मराठा आरक्षणावर चर्चा करण्यात आली असून राज्यातील हिंसाचार बंद व्हावा, अशी इच्छा मुख्यमंत्र्यांची आहे. तसेच आरक्षणाचा मुद्दा सोडविण्यास सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले, असेही राणेंनी सांगितले. मराठा समाजाचे नेते आणि राणे समितीचे अध्यक्ष या नात्याने सरकार आणि मराठा समाजात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मध्यस्थी करण्याचा माझा प्रयत्न आहे. आपल्याला मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावाच लागेल, असेही राणेंनी म्हटले.
मुख्यमंत्र्यांसोबतच मी मराठा समाज आंदोलकांच्या समन्वयकांचीही भेट घेतली. मराठा आरक्षण मिळावे ही माझीही इच्छा आहे. मात्र, आपणास मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावाच लागले, माझी त्यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी आरक्षणचा मुद्दा अग्रस्थानी असल्याचे म्हटले. तसेच माझ्या अंतर्गत नेमलेल्या समितीने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र, ते आरक्षण कोर्टाने रद्द केल्याचे राणे यांनी सांगितले. नारायण राणे समितीच्या अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना, आम्ही दिलेलं आरक्षण हे तामिळनाडूतील आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आले होते. मात्र, सरकार बदलल्यानंतर काही अडचणी आल्या आणि कोर्टाकडून हे आरक्षण रद्द करण्यातआल्याचे राणे यांनी म्हटले. तसेच सरकारने आरक्षणासंदर्भात चुका काढून मराठा समाजाची दिशाभूल करू नये. सर्वोतोपरी प्रयत्न करुन कोर्टाला कागदपत्रे सादर करावीत, असेही राणे म्हणाले.