ज्येष्ठ शिवसैनिकांची फौज उद्धवसेनेसाठी मैदानात; निवडणुकीसाठी मतदार यादीचीही पडताळणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 07:08 IST2025-11-27T06:53:57+5:302025-11-27T07:08:44+5:30
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत कार्य केलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ शिवसैनिक कक्ष स्थापन केला आहे.

ज्येष्ठ शिवसैनिकांची फौज उद्धवसेनेसाठी मैदानात; निवडणुकीसाठी मतदार यादीचीही पडताळणी
महेश पवार
मुंबई : ठाकरे घराण्याची तिसरी व चौथी पिढी पाहणारे ज्येष्ठ शिवसैनिक मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धवसेनेच्या प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. मतदारयादीची पडताळणीही ते करतील. मतदानादिवशी किमान १० मतदारांना केंद्रापर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य त्यांच्यासमोर ठेवले असून, या अनुभवी कार्यकर्त्यांना पुन्हा सक्रिय करण्याची मोहीम उद्धवसेनेने सुरू केली आहे.
दिवंगत शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत कार्य केलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ शिवसैनिक कक्ष स्थापन केला आहे. काहींनी तरुणपणी प्रबोधनकार ठाकरे व नंतर बाळासाहेबांचे अंगरक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. अनेकांनी शाखाप्रमुख, नगरसेवक, विभागप्रमुख अशी पदे भूषविली आहेत.
मुंबईसह राज्यातील सर्व जुन्या, अनुभवी शिवसैनिकांशी संपर्क साधण्यात येत आहे. सध्या मुंबई महापालिकेवर विजय मिळविणे हेच उद्दिष्ट आहे. त्यानंतर कक्षाचा राज्यभरात विस्तार करण्यात येईल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सहीचे ज्येष्ठ शिवसैनिक असे ओळखपत्र व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. ज्येष्ठ शिवसैनिकांसाठी आणखी काय करता येईल, याबाबत पक्षप्रमुखांसोबत पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. - चंद्रकांत कोपडे, अध्यक्ष, ज्येष्ठ शिवसैनिक कक्ष
८००हून अधिक जोडले
शिवसेना पक्ष फुटीनंतर या ज्येष्ठानी उद्धव यांच्यासोबत राहून महापालिका निवडणुकीत त्यांना विजय मिळवून देण्याचा निर्धार केला आहे. प्रत्येक बूथमध्ये सरासरी ३ ते ४ ज्येष्ठ शिवसैनिक आहेत. आतापर्यंत सुमारे ८००हून अधिक ज्येष्ठ शिवसैनिक कक्षासोबत जोडले गेले आहेत.
जबाबदारी काय? : ज्येष्ठ शिवसैनिकांनी शाखेत जाऊन शाखाप्रमुखांसोबत संवाद साधावा. मतदारयादीतील नाव, कुटुंबातील सदस्यांची व शेजाऱ्यांची नावे तपासावीत. फक्त तपासणी न करता प्रत्येकाने किमान १० व्यक्तींची जबाबदारी घ्यावी. प्रत्येक वॉर्डात किमान २ हजार नवी किंवा पुनर्रचित मते मिळवून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.