सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 05:54 IST2025-10-24T05:53:41+5:302025-10-24T05:54:19+5:30
भाजपच्या मित्र पक्षातील अनेक आमदार खुलेआम बोगस मतदार आहेत, हे स्वतः सांगत आहेत.

सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विरोधी पक्षाचे सोडा.. भाजपच्या मित्र पक्षातील अनेक आमदार खुलेआम बोगस मतदार आहेत, हे स्वतः सांगत आहेत. मग तेही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का, असा सवाल मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजप प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांना केला.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी जी मतदार यादी अद्याप उपलब्ध नाही, त्यावर गदारोळ करून गोंधळ माजविण्याचा गंभीर कट आता उघडकीस येऊ लागला आहे, असा आरोप उपाध्ये यांनी केला. त्यावर सावंत यांनी प्रत्युत्तर दिले.
काय म्हणाले उपाध्ये?
केवळ लोकशाही संस्था खिळखिळ्या करून त्यांची बदनामी करण्यापलीकडे कोणताही हेतू नाही आणि त्यासाठीच फेक नरेटिव्हची फेकाफेकी सुरू आहे, असे मत उपाध्ये यांनी व्यक्त केले. हे राजकारण लोकशाहीसाठी घातक आहे. ते हाणून पाडले पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.
बोगस मतदार आहेत का?
सावंत यांनी उपाध्ये यांना प्रत्युत्तर दिले. विधानसभेच्या यादीत घोळ होता. आता जाहीर होणाऱ्या यादीत ते घोळ आहेत का? हे यादी दाखविल्यावर कळेल, असे सांगत सत्ताधारी पक्षातील आमदारांनीही बोगस मतदार असल्याचे मान्य करतात, असे सावंत म्हणाले.