सार्वजनिक रुग्णालयांची क्षमता संपली आहे का? ज्याचे कुणी नाही, त्याला सरकारी रुग्णालये वाली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 09:06 AM2023-10-16T09:06:50+5:302023-10-16T09:07:09+5:30

गेल्या काही दिवसांत सार्वजनिक रुग्णालयात होणाऱ्या दैनंदिन मृत्यूमुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

Are public hospitals running out of capacity? For those who have no one, government hospitals are the guardians | सार्वजनिक रुग्णालयांची क्षमता संपली आहे का? ज्याचे कुणी नाही, त्याला सरकारी रुग्णालये वाली

सार्वजनिक रुग्णालयांची क्षमता संपली आहे का? ज्याचे कुणी नाही, त्याला सरकारी रुग्णालये वाली

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या काही दिवसांत सार्वजनिक रुग्णालयात होणाऱ्या दैनंदिन मृत्यूमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. यावरून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा मोठ्या संघर्ष पाहायला मिळत आहे. वैद्यकीय तज्ज्ञ आणि आरोग्य कार्यकर्त्यांच्या मते ज्या रुग्णाला कुठे जायला वाव नसतो, ज्यांना आर्थिक अडचण असते, रुग्ण अत्यवस्थ स्थिती असतो अथवा ज्या रुग्णाला खासगीत प्रवेश मिळत नाही, अशा रुग्णांना उपचारासाठी हक्काचे रुग्णालय म्हणजे सार्वजिनक रुग्णालय! काहीवेळा आपला रुग्ण वाचणार नाही हे तज्ज्ञांनी सांगितल्यानंतर सुद्धा ते शेवटच्या टप्प्यात चांगली शुश्रूषा व्हावी म्हणून सुद्धा या रुग्णालयात दाखल करण्यात असल्याचे कटुसत्य आहे. त्यामुळे या रुग्णालयात मृत्यूदर खासगी रुग्णालयांपेक्षा तुलनेने मोठ्या प्रमाणात असतो. 

यामुळे सरकारी रुग्णालयांवर ताण
मुंबईतील कूपर, सायन, नायर, के.इ.एम. आणि जे जे ही पाच प्रमुख रुग्णालये वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न आहेत. या ठिकाणी राज्यातील विविध भागांतून रुग्ण उपचारासाठी येतात. मुंबईतील ही रुग्णालये त्यांच्यासाठी मोठा आधार असतो. यामुळे या रुग्णालयांवर मोठ्या प्रमाणात ताण असतो.

सध्याच्या  घडीला गरीब रुग्णांसाठी सरकारी रुग्णालये मोठा आधार आहे, ती टिकली पाहिजे. रुग्णाची वाढती लोकसंख्या पाहता  रुग्णालयांची संख्या वाढणेसुद्धा गरजेचे आहे. त्याचप्रमाणे या रुग्णालयातून चांगली आरोग्य सुविधा रुग्णांना मिळाली पाहिजे. अनेकवेळा आपण बघतो ज्या रुग्णाला बाहेर कुठे खासगी रुग्णालयात थारा देत नाही त्या रुग्णाला याच सरकारी रुग्णालयात उपचार मिळतात. मात्र, कुणी नाही म्हणून सरकारी रुग्णालये, अशी ओळख या रुग्णालयाची होता कामा नये. अत्यवस्थ रुग्ण याच रुग्णालयात येतात. त्यामुळे कदाचित या रुग्णालयातील मृत्यूचा आकडा हा अधिक आहे.  
-विनोद शेंडे, आरोग्य चळवळीतील कार्यकर्ते

सर्व रुग्णांना उपचार देण्याची आमची जबाबदारी 
पहिली गोष्ट कोणताही रुग्ण आमच्या रुग्णालयात कोणत्याही परिस्थितीत आला तर त्याला उपचार देण्याची आमची जबाबदारी आहे. आम्ही कुठल्याही रुग्णाला प्रवेश नाकारत नाही. आमच्याच काही लहान रुग्णालयातूनही रुग्णांना या मोठ्या रुग्णालयात पाठविले जाते. आरोग्य उपचार सगळ्यांना मिळाले पाहिजे यासाठी आमचा आरोग्य विभाग कटिबद्ध आहे. त्यामुळे तो रुग्ण कुठून आला आहे. यापेक्षा आम्हाला त्याला कशा पद्धतीने उपचार देता येतील हा आमचा सातत्याने प्रयत्न असतो, आमचे सर्व डॉक्टर त्याच पद्धतीने रुग्णांवर उपचार करत असतात.  
डॉ. सुधाकर शिंदे, अतिरिक्त महापालिका आयुक्त

आमच्याकडे होते ‘डेथ ऑडिट’
जेजे रुग्णालयात राज्यातील विविध भागांतून रुग्ण येतात. काहीवेळा रुग्ण अत्यवस्थ अवस्थेत येतात, तर काहींना आय.सी.यू.ची गरज असते.  रुग्णाला उपचार देण्यासाठी आमचे सर्व डॉक्टर रात्रंदिवस काम करत असतात. सार्वजनिक रुग्णालयातील मृत्यूचा खासगीच्या तुलनेने अधिक असतो. आमच्याकडे रुग्णाच्या मृत्यूची कारणे शोधण्यासाठी समिती आहे. त्याला डेथ ऑडिट म्हणतो. त्यातून आम्हाला बऱ्याच गोष्टींचा उलगडा होत असतो. 
डॉ. पल्लवी सापळे, अधिष्ठाता, सर जे जे समूह रुग्णालय

इथे रोज होतात किमान ५० मृत्यू
मुंबई शहरातील पाच प्रमुख सार्वजनिक अशा सरकारी आणि महापालिका रुग्णालयांत दरदिवशी सरासरी ५० रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे दिसून आले आहे.

Web Title: Are public hospitals running out of capacity? For those who have no one, government hospitals are the guardians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.