कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षाचालकांची मनमानी, बीकेसीसाठी १३० रुपये भाडे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 17:09 IST2024-12-11T17:09:10+5:302024-12-11T17:09:31+5:30

बेस्ट बसच्या अपघातानंतर कुर्ला रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडून सुटणाऱ्या बेस्ट बसच्या मार्गामध्ये बदल करण्यात आला.

Arbitrary rickshaw pullers outside Kurla railway station 130 rupees fare for BKC | कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षाचालकांची मनमानी, बीकेसीसाठी १३० रुपये भाडे!

कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षाचालकांची मनमानी, बीकेसीसाठी १३० रुपये भाडे!

महेश कोले

मुंबई-

बेस्ट बसच्या अपघातानंतर कुर्ला रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडून सुटणाऱ्या बेस्ट बसच्या मार्गामध्ये बदल करण्यात आला. त्यामुळे मंगळवारी कुर्ला स्थानकातून इच्छितस्थळी जाण्यासाठी एकही बस उपलब्ध नव्हती. याचा फायदा रिक्षाचालकांनी घेतला. त्यांनी मनमानी पद्धतीने प्रवाशांची लूट केली. स्थानकापासून बीकेसी, म्हाडा, वांद्रे रेक्लमेशन आणि वांद्रे स्थानकात मीटरने जाण्यास नकार देत मनमानी पद्धतीने भाडे आकारले. 

कुर्ला स्थानकातून बीकेसीमध्ये जाण्यासाठी ५.५ किमी अंतरासाठी १२० ते १३० रुपये भाडे आकारण्यात येत होते. म्हाडा, वांद्रे स्थानक, वांद्रे रिक्लेमेशनकडे जाण्यासाठी १५० ते १६० रुपयांची मागणी केली जात होती. कामावर जाणाऱ्या प्रवाशांना नाइलाजाने हे भाडे द्यावे लागले. शेअर रिक्षाचालक मात्र  ३ ऐवजी ५ प्रवासी भरून वाहतूक  करत होते. याबद्दल प्रवाशांनी तीव्र शब्दांत नाराजी 
व्यक्त केली. 

बसमार्ग वळविले 
- अपघातामुळे कुर्ला पश्चिम येथील बेस्ट आगारही रात्रीच बंद केेले होते. या पार्श्वभूमीवर ३७, ३२०, ३१९, ३२५, ३३०, ३६५ आणि ४४६ या मार्गावरील बस कुर्ला आगारातून चालवण्याचा निर्णय घेण्यात आला.  
- सांताक्रुझ स्टेशन ते कुर्ला स्टेशन चालणारे बसमार्ग ३११, ३१३ आणि ३१८ च्या बसेस टिळक नगरवरून यू टर्न घेऊन कुर्ला स्टेशन न जाता सांताक्रुझ स्टेशनकडे पाठवण्याचा निर्णय बेस्टकडून घेण्यात आला.
- या सर्व बसमार्गाचे प्रवर्तन उपक्रमाकडून सकाळी करण्यात आले. यामुळे कुर्ला रेल्वेस्थानकावरून बाहेर पडणारे प्रवासी गोंधळलेले होते.

बेस्टच्या अपघातामुळे झालेले नुकसान भरून काढता येणार नाही. मात्र बेस्टने या भागातील सेवा बंद करून  प्रवाशांना असे वेठीस धरणे योग्य नाही. एका दिवसापुरते अशा गोष्टी सहन करू शकतो. परंतु रोज इतके पैसे खर्च करणे म्हणजे खिशावर अनावश्यक अधिक भर आहे. 
- अभिषेक कानडे, प्रवासी

Web Title: Arbitrary rickshaw pullers outside Kurla railway station 130 rupees fare for BKC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.