Join us

राजकारणात काहीही घडू शकते, दिल्लीतील चर्चा सार्वजनिक करणार नाही; आशिष शेलारांचे मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 23:35 IST

तिन्ही पक्ष दुर्बळ झाले म्हणून एकत्र आलेत. सबळ माणूस दुसऱ्याच्या मदतीने हातात हात पकडून चालत नाही असा टोला शेलारांनी महाविकास आघाडीला लगावला.

मुंबई - केंद्रीय स्तरावर जर काही चर्चा असेल तर सार्वजनिक करू शकत नाही. तो मला अधिकारही नाही. पण राजकारणात काहीही घडू शकते. कल्पोकल्पित गोष्टींवर उत्तर देण्यापेक्षा भाजपा आणि आशिष शेलार काँक्रिट करून दाखवू. आम्ही ते दाखवणार अशा शब्दात मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांनी भाष्य केले आहे. अजित पवार यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतल्याबाबत पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला होता. त्यावर ते बोलत होते. 

आशिष शेलार म्हणाले की, अजित पवारांना त्यांची भूमिका स्पष्ट करावी लागेल. भाजपाला हा प्रश्न विचारणे चुकीचे आहे. राष्ट्रवादीत काय चाललंय त्यांच्या पक्षाला माहिती आहे. अजितदादांचा निर्णय हा त्यांच्या पक्षाचा किंवा व्यक्तिगत निर्णय असेल. भाजपा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबात महाराष्ट्रात एकत्र राज्य करतेय. सरकार खंबीर आहे. जनतेची सेवा करतेय. सरकारबरोबर सेवेचे कामही सुरू आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच तिन्ही पक्ष दुर्बळ झाले म्हणून एकत्र आलेत. सबळ माणूस दुसऱ्याच्या मदतीने हातात हात पकडून चालत नाही. सबळ माणूस स्वत:च्या पायावर चालतो. भाजपा सबळ आहे. एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना सोबत आहे. काँग्रेसला राष्ट्रवादीची मदत लागते. राष्ट्रवादी-काँग्रेसला उद्धव ठाकरेंची मदत लागते. उद्धव ठाकरेंना वंचितची मदत लागते. सर्व दुर्बळ एकत्र येऊन सबळ माणसाचा सामना करू शकत नाही. लोकसभेत महाराष्ट्रात हे चित्र दिसेल असा विश्वास शेलारांनी व्यक्त केला. 

कर्नाटकात भाजपाच येणारदरम्यान, स्वप्न बघायला टॅक्स लागत नाही. चर्चा करायला ऊर्जा लागत नाही. भाजपाने बूथ पातळीवर काम केले आहे. सरकारने लोकांपर्यंत विकास पोहचवला आहे. त्यामुळे कर्नाटकात भाजपाची सत्ता येईल यात शंका नाही असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :आशीष शेलारभाजपाअजित पवार