आठवडाभरात आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार; शिंदे गटाची नाराजी दूर करण्याचा करणार प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 06:11 IST2023-07-04T06:10:44+5:302023-07-04T06:11:42+5:30
सर्व आमदारांनी यापुढेही सरकारशी एकनिष्ठ राहून विकासकामात सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी केले.

आठवडाभरात आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार; शिंदे गटाची नाराजी दूर करण्याचा करणार प्रयत्न
मुंबई : राष्ट्रवादीतील आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर शिंदे गटात नाराजी पसरली होती. ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला असून, आठवडाभरात आणखी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असून, मंत्रिमंडळातील सर्व जागा भरणार असल्याचे त्यांनी सोमवारी जाहीर केले.
गुरुपौर्णिमेनिमित्त शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिल्यानंतर मंत्रालयात समोरील बाळासाहेब भवन येथे पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे ही माहिती दिली. ते म्हणाले, रविवारी विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यासह अन्य नेते सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे सरकार आणखी जोरात काम करेल. सर्व आमदारांनी यापुढेही सरकारशी एकनिष्ठ राहून विकासकामात सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी केले.
आधी विस्तार होणार की खातेवाटप?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्य मंत्रिमंडळाचा आणखी एक विस्तार केल्यानंतरच एकत्रितपणे खातेवाटप जाहीर करतील की आधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले जाईल या बाबतचा पेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसा सोडवतात याबाबत उत्सुकता आहे.