Join us  

संततधारेमुळे 'भर'भराट; तलावांमध्ये जमला ४,१७,९४२ दशलक्ष लीटर जलसाठा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 6:50 AM

मुंबईला दररोज ३,८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो.

मुंबई : पावसाचा जोर मुंबईत ओसरला. मात्र, तलावांमध्ये संततधार सुरू आहे. यामुळे गेल्या २४ तासांत तलावात सुमारे चार टक्क्यांनी जलसाठा वाढला आहे. दहा दिवसांत हा साठा चार टक्क्यांवरून २९ टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे मुंबईला दिलासा मिळाला आहे.

जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तलावांकडे पावसाने पाठ फिरविली होती. मात्र, त्यानंतर जोरदार हजेरी लावत तलावांमध्ये पावसाने बॅटिंग सुरूच ठेवली आहे. गेल्या शनिवारपासून दररोज तलावांच्या पातळीत पाच टक्क्यांनी वाढ होत आहे. मंगळवारी तलावांमध्ये आणखी ५७ हजार दशलक्ष लीटरने जलसाठा वाढला. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये एकूण चार लाख १७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा आता जमा झाला आहे.

मुंबईला दररोज ३,८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, यापैकी ३० टक्के पाणी गळती व चोरीमुळे वाया जाते. तलावांमध्ये पाणी कमी असल्याने १५ नोव्हेंबर, २०१८ पासून मुंबईत सरसकट दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. तलाव भरून वाहण्यासाठी आणखी ७१ टक्के जलसाठ्याची गरज आहे. पाऊस सतत कोसळत राहिल्यास मुंबईचे पाण्याचे टेन्शन मिटेल.१४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर साठा अपेक्षितमुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे. सध्या तलावांमध्ये चार लाख १७ हजार ९४२ दशलक्ष लीटर जलसाठा जमा आहे.

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटपाऊसनदीधरण