महापालिकेकडून वर्धापन दिनी ‘बेस्ट’ भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 01:28 AM2019-08-08T01:28:06+5:302019-08-08T01:28:18+5:30

१,२०० कोटींचे कर्ज मंजूर; वार्षिक दीडशे ते दोनशे कोटी रुपये भरावे लागते व्याज

Anniversary 'Best' gift from the municipality | महापालिकेकडून वर्धापन दिनी ‘बेस्ट’ भेट

महापालिकेकडून वर्धापन दिनी ‘बेस्ट’ भेट

Next

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या ७३ व्या वर्धापन दिनाला महापालिकेने मोठी भेट दिली आहे. विविध बँकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी आयुक्त प्रवीण परदेशी यांनी बेस्टला ११३६.३१ कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देऊ केले आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने बुधवारी ‘बेस्ट दिनी’च हिरवा कंदील दाखविला.

आर्थिक संकटातून बेस्ट उपक्रमाला बाहेर काढण्याचा निर्धार आयुक्तांनी केला आहे. यामुळे बेस्टला आर्थिक सहायक करण्याची मागणी करणाऱ्या नगरसेवकांच्या मागणीला बळ मिळाले. त्यानुसार, पालिका प्रशासनाने तीनशे कोटी रुपये आर्थिक साह्य यापूर्वीच दिले आहेत. या रकमेतून महापालिकेचा दैनंदिन व्यवहार चालविणे, तसेच निवृत्त कामगारांची ग्रॅच्युइटी देण्यात येणार आहे. मात्र, बेस्ट उपक्रमाच्या डोक्यावर दोन हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. हे कर्ज फेडण्यासाठी बेस्ट उपक्रमाला वार्षिक दीडशे ते दोनशे कोटी रुपये व्याज भरावे लागत आहे. त्यामुळे बेस्टला बिनव्याजी कर्ज देण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. त्यानुसार, आयुक्तांनी कर्ज मंजूर केले आहे. ही रक्कम केवळ कर्ज फेडण्यासाठी वापरण्यात येणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

बिनव्याजी रक्कम कर्ज फेडण्यासाठीच
उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याने बेस्ट उपक्रमाला दैनंदिन खर्च भागविण्यासाठी कर्ज घ्यावे लागले. कामगारांचे वेतन देणेही अवघड झाले होते. अशाने कर्ज वाढत गेले असून, बेस्ट उपक्रमावर सध्या दोन हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे.
२०११ मध्ये महापालिकेने बेस्ट उपक्रमाला १,६०० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. मात्र, दहा टक्के व्याजाने हे कर्ज दिल्यामुळे ते फेडताना बेस्ट उपक्रमाने नवीन कर्ज घेतले. या कर्जावरील व्याज माफ करण्याची मागणी अनेक वेळा नगरसेवकांनी केली होती. मात्र, आता पालिकेने सुमारे १,२०० कोटींचे बिनव्याजी कर्ज मंजूर केले आहे. मात्र, ही रक्कम कर्ज फेडण्यासाठीच वापरता येणार आहे.
महापालिकेच्या अटीनुसार बेस्ट उपक्रमाने ९ जुलैपासून प्रवासीभाड्यात कपात केली आहे. त्यानुसार, किमान पाच रुपये ते २० रुपये प्रवासी भाडे सध्या आकारण्यात येत आहेत. मात्र, भाडेकपातीमुळे प्रवाशांची संख्या दहा लाखांनी वाढली आहे. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात सुमारे तीन हजार बसगाड्या वाढणार आहेत.

Web Title: Anniversary 'Best' gift from the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BESTबेस्ट