Join us

आरेतल्या झाडांचे वर्षश्राद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 17:13 IST

Mumbai Metro : पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा

मुंबई : मेट्रो-३ चे कारशेड दुसरीकडे हलविण्यात येणार असले तरी वर्षभरापूर्वी मेट्रोसाठी तोडण्यात आलेल्या वृक्षांची एक आठवण म्हणून आरे येथील आदिवासी बांधवांसह येथील पर्यावरण प्रेमींनी आरे कॉलनीतल्या झाडांचे वर्षश्राध्द घातले. शिवाय पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा असा संदेश देखील दिला. रविवारी  सकाळी दहा साडेदहाच्या सुमारास आदिवासी बांधवांसह येथे एकत्र आलेल्या पर्यावरण प्रेमींनी तोडण्यात आलेल्या वृक्षांना श्रद्धांजली वाहिली. शिवाय सेव्ह आरे असा संदेश देत आपले जंगलाप्रती असलेले प्रेम व्यक्त केले. आणि झाडांसाठी आपला लढा असाच सुरु राहील, असाही निर्धार व्यक्त केला.गेल्या वर्षी कुलाबा-वांद्रे-सीप्झ या पहिल्या वहिल्या भूयारी मेट्रो-३ च्या कारशेडसाठी गोरेगाव येथील आरे कॉलनीमधील झाडे रात्रीच्या रात्री तोडण्यात आली होती. या वृक्ष तोडीस येथील पर्यावरण प्रेमींनी विरोध केला होता. मात्र प्रशासनाने बळाचा वापर करत आंदोलकर्त्यांना अटकाव केला होता. येथील वृक्षतोड थांबविण्याकरिता आंदोलन केलेल्या आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावी, अशी विनंती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतीच राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर सदस्यांनी देखील याला अनुमोदन दिले. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे गुन्हे लगेच मागे घेण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश गृह विभागास दिले होते.-------------------- ४ ऑक्टोबर २०१९ रोजी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने रात्री आरेमधील मेट्रो-३ साठी झाडे कापण्यास सुरुवात केली.- यास येथील पर्यावरणप्रेमींनी विरोध केला. मात्र यावेळी २९ आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.- आंदोलकांमध्ये अनेकजण विद्यार्थी, गृहिणी, आदिवासी समाजातील कार्यकर्ते आहेत.

 

टॅग्स :आरेपर्यावरणमुंबईमेट्रोएमएमआरडीएसरकार