Join us  

"....कुछ नन्हे पटोले, खुद ही जल जाएँगे ये लाइलाज फफोले"; अमृता फडणवीसांचा नाना पटोलेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 4:23 PM

Amruta Fadnavis And Nana Patole : मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादात आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही उडी घेतली आहे.

मुंबई - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो असे खळबळजनक वक्तव्य केले होते. यावरून ते आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितीन गडकरी यांनी पटोलेंच्या अटकेची मागणी केली आहे. यावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादात आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही उडी घेतली आहे. "....कुछ नन्हे पटोले, खुद ही जल जाएँगे ये लाइलाज फफोले" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून नाना पटोले यांना टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना सूर्याची उपमा देत काही ओळी शेअर केल्या आहेत. तसेच मोदी यांचं काम दाखवणारा एक व्हिडीओही त्यांनी शेअर केला आहे. "सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले! पर इल्म नहीं है उन्हें के इस प्रगति की रोशनी को बुझाने की होड़ में, खुद ही जल जाएँगे ये लाइलाज फफोले!" असं अमृता यांनी म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी ModiHaiToMumkinHai आणि modiJiJiyoHazaroSaal हे हॅशटॅग देखील वापरले आहेत. 

 नाना पटोले यांनी त्यांच्या मतदारसंघात प्रचार केला. त्यावेळी नाना पटोले म्हणाले, मी का भांडतो. गेल्या 30 वर्षांपासून राजकारणात आहेत. लोक पाच वर्षात आपल्या पिढीचा उद्धार करतात. शाळा-कॉलेज काढतात. मी एवढ्या वर्षाचा राजकारणात आहे. एक शाळा घेतली नाही. ठेकेदारी केली नाही. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारू शकतो, मोदीला शिव्या देऊ शकतो. म्हणूनच मोदी माझ्या विरोधात प्रचारासाठी आले होते, असे नाना पटोले व्हिडीओत म्हणताना दिसतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

यावर स्पष्टीकरण देताना नाना पटोले यांनी मी गावगुंड असलेल्या मोदीबद्दल बोललो होतो. काही नागरिक आमच्या परिसरातील मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार घेऊन आले होते. त्यांना तुम्ही घाबरू नका. मी तुमच्या सोबत आाहे. मोदीला मी मारू शकतो, शिव्या देऊ शकतो असे म्हटले. मी कुठेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. माझ्या बोलण्याचा विपर्यास केला जात आहे असंही  पटोले यांनी 'लोकमत'ला सांगितलं. काहीही असले तरी नाना पटोलेंच्या वक्तव्यावरून आता राज्यातील राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत. नारायण राणेंनी ट्विट करत नाना पटोलेंच्या अटकेची मागणी केली आहे. हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असून पटोले यांचे वक्तव्य घृणास्पद आहे. काँग्रेस नेते एवढ्या खालच्या पातळीवर जातील याचे मला कोणतेही आश्चर्य नसल्याचे राणे म्हणाले.  

टॅग्स :अमृता फडणवीसनाना पटोलेकाँग्रेसनरेंद्र मोदी