अमृता फडणवीस, अक्षय कुमार यांच्यासह २ हजार नागरिक, स्वयंसेवकांकडून स्वच्छता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 11:00 IST2025-09-08T10:59:33+5:302025-09-08T11:00:20+5:30

विसर्जनानंतर जुहू चौपाटीवर पडलेला कचरा गोळा करण्यासाठी आयोजित केलेल्या या उपक्रमात तब्बल दोन हजारांहून अधिक नागरिक, स्वयंसेवक सहभागी झाले होते.

Amrita Fadnavis, Akshay Kumar and 2,000 citizens and volunteers clean the city | अमृता फडणवीस, अक्षय कुमार यांच्यासह २ हजार नागरिक, स्वयंसेवकांकडून स्वच्छता

अमृता फडणवीस, अक्षय कुमार यांच्यासह २ हजार नागरिक, स्वयंसेवकांकडून स्वच्छता

मुंबई : गणेश विसर्जन पार पडल्यानंतर आता निसर्ग संवर्धनाचा संदेश पोहोचविण्यासाठी दिव्यज फाऊंडेशनतर्फे जुहू बीच स्वच्छता मोहीम रविवारी घेण्यात आली. मुंबई महापालिका आणि पोलिसांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह अभिनेता अक्षय कुमार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, पालिका आयुक्त भूषण गगराणी, आमदार अमित साटम, उद्योगपती निरंजन हिरानंदानी, डोम एंटरटेनमेंटचे एमडी मजहर नाडियाडवाला, सीमा सिंग सहभागी झाले होते. 

विसर्जनानंतर जुहू चौपाटीवर पडलेला कचरा गोळा करण्यासाठी आयोजित केलेल्या या उपक्रमात तब्बल दोन हजारांहून अधिक नागरिक, स्वयंसेवक सहभागी झाले होते. आपला समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्याचा संदेश यावेळी मान्यवरांनी दिला. 

हा उपक्रम नागरिक आणि प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नांचे उत्तम उदाहरण आहे. प्रत्येक मुंबईकराने या चळवळीत सामील व्हावे, असे अभिनेता अक्षय कुमार याने म्हटले, तर मुंबईच्या स्वच्छ व शाश्वत विकासासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे गगराणी यांनी सांगितले. 

मंत्री लोढा यांनी स्वच्छतेचे संस्कार ही समाजाची जबाबदारी असल्याचे सांगत या मोहिमेला ‘नैसर्गिक वारसा जपण्याचा टप्पा’ असे संबोधले.

गणेशोत्सव हा आनंद, एकोपा आणि भक्तीचा उत्सव आहे. मात्र, उत्सवासोबत पर्यावरण जपण्याची जबाबदारीदेखील आपली आहे. प्रत्येक मुंबईकराला स्वच्छ व हिरवीगार मुंबई घडविण्याचे आवाहन अमृता फडणवीस यांनी केले.

Web Title: Amrita Fadnavis, Akshay Kumar and 2,000 citizens and volunteers clean the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.