Amit Shah Eknath Shinde Meeting Maratha Reservation : मुंबईत सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतोय. मनोज जरांगे हे मुंबईच्या आझाद मैदानात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. तशातच आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील मुंबईत आले. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी ते मुंबईत आले. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरातील बाप्पाचे त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर लालबागचा राजा बाप्पाचे दर्शन घेतले. परंतु, गणेशदर्शनाचा दौरा सुरू करण्याआधी त्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर तासभर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मराठाच्या आरक्षणाच्या विषयावर बंद दाराआड चर्चा केली.
आज मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. महाराष्ट्रातून लाखो मराठा आंदोलक गाड्या घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत. यामुळे दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मराठा आंदोलन चिघळताना दिसत आहे. तशातच अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात मराठा आरक्षणावरुन चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. सह्याद्री अतिथीगृहावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास तासभर बैठक सुरु होती. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. तसेच आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांवर देखील अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्या चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.
ओबीसीमधून मराठा आरक्षण द्या, ही मनोज जरांगे यांची प्रमुख मागणी आहे आणि याच मागणीवर एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांची सह्याद्री निवासस्थानी चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. ओबीसी आरक्षणातून मराठा आरक्षण द्यायचं असल्यास तर केंद्र सरकारकडून त्या गोष्टी करता येऊ शकतात. त्यामुळे ही कोंडी कशाप्रकारे सोडवता येईल यावर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.