Join us

"...तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील’’, पाकिस्तानी कलाकारांवरून मनसे पुन्हा आक्रमक, निर्मात्यांना दिला सक्त इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 11:13 IST

Ameya Khopkar: काही वर्षांपूर्वी भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले असताना बॉलिवूड आणि टेलिव्हिजन क्षेत्रात काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती.

मुंबई - काही वर्षांपूर्वी भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले असताना बॉलिवूड आणि टेलिव्हिजन क्षेत्रात काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर अनेक निर्मात्यांना आणि निर्मिती संस्थांना आपल्या प्रोजेक्टमधून पाकिस्तानी कलाकारांनी वगळावे लागले होते. दरम्यान, आता पाकिस्तानी कलाकारांविरोधात मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष् अमेय खोपकर यांनी पाकिस्तानी कलाकारांच्या मुद्द्यावरून निर्मात्यांना सक्त इशारा दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहून खोपकर यांनी हा इशारा दिला आहे. त्यात अमेय खोपकर म्हणतात की, बॉलिवूडमधील काही निर्मात्यांना पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आलाय, असं कानावर येतंय. ही नीच प्रवृत्ती वेळोवेळी ठेचावीच लागते, म्हणूनच पुन्हा एकदा आम्ही स्पष्ट शब्दात इशारा देतोय की फक्त मुंबईच काय, भारतातील कोणत्याही भाषेतल्या कलाकृतीत पाकिस्तानी कलाकार दिसला तर त्याचे गंभीर परिणाम संबंधित निर्मात्यांना भोगावे लागतील, असा इशाराच खोपकर यांनी दिला आहे.

मनसेकडून दिलेल्या या इशाऱ्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये मनोरंजन जगतात आता आणखी एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

टॅग्स :मनसेराज ठाकरेटेलिव्हिजनबॉलिवूड