मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ऑल आउट ऑपरेशन, ५,८३६ वाहनांची झाडाझडती
By मनीषा म्हात्रे | Updated: May 19, 2024 19:32 IST2024-05-19T19:31:48+5:302024-05-19T19:32:12+5:30
९३३ अस्थापनांची झाडाझडती, दीड हजार चालकांवर कारवाई

मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ऑल आउट ऑपरेशन, ५,८३६ वाहनांची झाडाझडती
मुंबई: लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांनी राबविलेल्या ऑल आउट ऑपरेशन राबवले. याअंतर्गत शहरातील १६०५ ठिकाणी नाकाबंदी करत ५ हजार ८३६ वाहनांची झाडाझडती घेत दीड हजार चालकांवर कारवाई केली. २०५ ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबवत ११२ आरोपींवर कारवाई केली.
शनिवारी रात्री १० वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत राबविण्यात आलेल्या आँपरेशन आँल आऊट दरम्यान पोलिसांनी शहरातील ५३९ संवेदनशील ठिकाणांची तपासणी केली. सोबतच पोलिसांनी २०५ ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबवले. यात पोलीस अभिलेखावरील १०९५ गुन्हेगारांची तपासणी करुन ११२ आरोपींची धरपकड करत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. संशयितरित्या फिरणाऱ्या ८२ जणांवर कारवाई करण्यात आली.
पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या नेतृत्वात शहरातील पाच प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त तसेच विशेष शाखेचे अपर पोलीस आयुक्त, १३ परिमंडळाचे उपायुक्त, सर्व विभागीय सहायक आयुक्त, पोलीस ठाण्याचे वपोनि, पोलीस अधिकारी व अंमलदार या आँपरेशन आँल आऊटमध्ये सहभागी झाले होते.
पथकाने मुंबईत १६०५ ठिकाणी नाकाबंदी करत ५ हजार ८३६ वाहनांची झाडाझडती घेत १,५५८ चालकांवर कारवाई केली. यामध्ये एक ड्रंक अँड ड्राइव्हचीही कारवाई करण्यात आली. अजामीनपात्र वाँरंट बजावलेल्या १७ आणि अवैधरीत्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी ३१ कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून चाकू, तलवारी अशी घातक हत्यारे जप्त केली आहेत. शहरात चालणाऱ्या दारु विक्री, जुगार अशा अवैध धंदे चालणाऱ्या १५ ठिकाणी छापेमारी करत २५ जणांना अटक केली. तसेच, अंमली पदार्थ कायद्यानव्ये ४६ कारवाया करण्यात आल्या आहे.
९३३ अस्थापनांची झाडाझडती
शहरात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या हेतूने पोलिसांनी शहरातील हाँटेल्स, लाँज, मुसाफिरखाने अशा ७३८ अस्थापनांची झाडाझडती घेतली.