धोक्याची घंटा! देशातील ५२ टक्के गर्भवतींना ‘ॲनिमिया’ने ग्रासले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 09:55 IST2026-01-04T09:55:01+5:302026-01-04T09:55:01+5:30
वेळीच सावध होण्याची गरज; होणाऱ्या बाळाच्या भविष्यासाठी चिंताजनक परिस्थिती

धोक्याची घंटा! देशातील ५२ टक्के गर्भवतींना ‘ॲनिमिया’ने ग्रासले
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ‘राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-५’च्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील ५२.२% गर्भवती महिला ॲनिमिया (रक्तक्षय) ग्रस्त असल्याचे उघड झाले आहे. ही परिस्थिती केवळ मातांच्या आरोग्यासाठीच नव्हे, तर होणाऱ्या बाळाच्या भविष्यासाठीही चिंताजनक ठरत आहे.
एनएफएचएस-४ (२०१५-१६) च्या तुलनेत एनएफएचएस-५ (२०१९-२१) मध्ये ॲनिमियाच्या प्रमाणात वाढ झाल्याचे आढळले. हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे होणारा हा आजार माता मृत्यूदरासाठी एक मुख्य कारणीभूत घटक ठरत आहे. ॲनिमियामुळे बाळाचा जन्म वेळेआधी होणे आणि जन्माच्या वेळी बाळाचे वजन कमी भरणे यांसारख्या समस्या उद्भवत आहेत.
महाराष्ट्राची स्थिती काय?
महाराष्ट्रातील ४५% ते ५०% गर्भवती महिला ॲनिमियाने त्रस्त आहेत. राज्यात ‘ॲनिमियामुक्त भारत’ मोहिमेंतर्गत लोहाच्या गोळ्यांचे वाटप केले जात असले, तरी आहाराबाबत अजूनही जनजागृतीची गरज आहे.
असंतुलित आहार, पौष्टिक अन्नाचा अभाव, वारंवार गर्भधारणा, कमी अंतराने प्रसूती, किशोरवयात विवाह, तसेच अपुऱ्या आरोग्यसेवा ही ॲनिमियाची प्रमुख कारणे आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये ही समस्या अधिक तीव्र आहेत. ॲनिमियावर उपचार करताना रक्तक्षयाची तीव्रता ओळखून उपचार करणे आवश्यक आहे. सौम्य ॲनिमियाच्या रुग्णांसाठी तोंडावाटे दिली जाणारी लोहयुक्त पूरक औषधे उपयुक्त ठरतात. - डॉ. रेखा डावर, वरिष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ.
ॲनिमियाची कारणे
आहारातील अडथळे : तृणधान्यांमध्ये ‘फायटेट्स’ असतात. हे घटक लोह शोषून घेण्यापासून रोखतात.
जीवनचक्रातील कमतरता : किशोरवयातच ॲनिमियाग्रस्त असल्याने गर्भधारणेच्यावेळी त्यांच्या शरीरात लोहाचा साठा आधीच कमी असतो.
आजार आणि संसर्ग : जंतुसंसर्ग आणि मलेरिया यांसारख्या आजारांमुळे शरीरातील लोहाचा जलद गतीने ऱ्हास होतो.
रक्तविकार : मासिक पाळीचा त्रास किंवा ‘वॉन विलेब्रँड’सारख्या रक्तविकारांमुळेही लोहाची साठवणूक कमी होते.
लडाख : येथे ७८.१% गर्भवती महिला ॲनिमियाग्रस्त आहेत. गुजरात : येथे ६२.६% महिलांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. पश्चिम बंगाल : येथील प्रमाण ६२.३% इतके जास्त आहे. मिझोराम : येथील महिलांच्या आरोग्याची स्थिती उत्तम असून प्रमाण २७.९% आहे. नागालँड : येथे केवळ २२.२% गर्भवती महिलांमध्ये ॲनिमिया आढळला. बिहार : येथे ६३.१% महिलांना या समस्येचा सामना करावा लागत आहे.