'Ajit Pawar's oath, NCP's alliance with BJP; These are the strategies that Modi-Pawar meeting? Says Devendra Fadanvis | अजित पवारांचा शपथविधी, राष्ट्रवादीची भाजपासोबत युती; मोदी-पवार भेटीतील हीच रणनीती?
अजित पवारांचा शपथविधी, राष्ट्रवादीची भाजपासोबत युती; मोदी-पवार भेटीतील हीच रणनीती?

मुंबई - महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर शिवसेना-भाजपात मुख्यमंत्रिपदावरुन वाद झाला. त्यानंतर जवळपास महिनाभर सत्तासंघर्षात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन करुन सत्ता मिळविली. या संपूर्ण घडामोडीत अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांचे ८० तासांचे सरकार हा घटनाक्रम मोठा आहे. नेमकं शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत काय घडलं होतं? अजित पवारांचा शपथविधी शरद पवारांनाचा सांगून झाला होता का? याबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. 

आजतक या हिंदी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवारांनी मला सांगितले की, शरद पवारांशी बोलणं झालं आहे. याबाबत अनेक दिवसांपासून बातचीत सुरु होती. ज्यावेळी अजित पवारांनी समर्थनाची बाब पुढे आणली त्यानंतर आम्ही राज्यपालांना जाऊन पत्र सोपवलं. काही तांत्रिक बाबींमुळे शपथविधी लवकर झाला. मी स्वत: राष्ट्रवादीच्या आमदारांशी बोललो होतो. त्यांनीही सांगितले की, शरद पवारांना याबाबत सगळी माहिती आहे. 

तसेच मोदी भेटीतील काही गोष्टी शरद पवारांनी सांगितल्या असल्या तरी संपूर्ण भेटीत काय काय बोलणं झालं? ही पूर्ण माहिती पवारांनी सांगितली नाही. या भेटीबाबत योग्य वेळी नरेंद्र मोदी भाष्य करतील. शरद पवार जे सांगतायेत ते त्यांच्या फायद्याचं आहे तेवढचं. आम्ही अजित पवारांसोबत सरकार बनविले त्यावेळी आमच्याकडे नंबर होते. मात्र सर्वांना माहिती आहे राष्ट्रवादी जे करते ते कधी सांगत नाही असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

दरम्यान, राष्ट्रवादीसोबत युती करण्यास मलाही अडचण वाटत होती. आम्ही एकमेकांचे विरोधक आहोत. पण ज्यावेळी आपला कोणी विश्वासघात केला असेल तर राजकारणात सक्रिय राहावं लागतं. मात्र आता राष्ट्रवादीने शिवसेना-काँग्रेससोबतीने सरकार बनविले आहे तर आमच्याकडे पर्याय नाही. हे सरकार ऑटो रिक्षा सरकार आहे. जे स्वत:च्या ओझ्याखाली पडेल. आम्ही कोणतंही ऑपरेशन लोटस चालविले नाही. शिवसेनेने आमचा विश्वासघात केला. उद्धव ठाकरेंनी आमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि बोलण्यापासून नकार दिला हे कधी घडलं नाही असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.  
 

Web Title: 'Ajit Pawar's oath, NCP's alliance with BJP; These are the strategies that Modi-Pawar meeting? Says Devendra Fadanvis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.