Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मला अजित पवार पाहिजे ते खातं देणार होते, पण.."; अनिल देशमुखांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 15:04 IST

अनिल देशमुख माझ्यासोबत सगळ्या बैठकांना हजर होते. राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होत असताना आमच्याकडून अनिल देशमुख यांचाही मंत्रीपदाचा प्रस्ताव देण्यात आला होता.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर प्रथमच उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शरद पवार गटावर हल्लाबोल करत अनेक गौप्यस्फोट केले. त्यानंतर, आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अनिल देशमुख यांच्याबद्दलही मोठा गौप्यस्फोट केला. राष्ट्रवादीत दोन गट पडले असता अनिल देशमुख यांनी आपण भाजपासोबत जाणार नाही, पवारसाहेबांसोबतच असल्याचं म्हटलं होतं. मात्र, अनिल देशमुख माझ्यासोबत सर्व बैठकीला हजर होते. केवळ मंत्रीपद न मिळाल्याने ते दुसऱ्या गटासोबत गेल्याचं अजित पवारांनी म्हटलं होतं. त्यावर, आता देशमुख यांनी पलटवार केला आहे. 

अनिल देशमुख माझ्यासोबत सगळ्या बैठकांना हजर होते. राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होत असताना आमच्याकडून अनिल देशमुख यांचाही मंत्रीपदाचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, भाजपने अनिल देशमुखांच्या मंत्रीपदाला नकार दिला. अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करुन, त्यांच्याबद्दल सभागृहातही आवाज उठवला होता. त्यामुळेच, भाजपने त्यांच्या मंत्रीपदासाठी स्पष्ट नकार दिला. त्यावेळी, मला मंत्रीपद नाही, तर मी तुमच्यासोबत नाही, असे म्हणत अनिल देशमुख यांनी दुसऱ्या गटासोबत जाणं ठरवलं, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला पत्रकार परिषदेत केला होता. त्यावर, आता अनिल देशमुख यांनी एका भाषणात बोलताना पलटवार केला.   

अजित पवार मला मंत्रीपद द्यायला तयार होते. जे खातं पाहिजे तेही देत होते. पण, ८३ वर्षांच्या बापाला सोडून मी तुमच्यासोबत येणार नाही, असे मी अजित पवारांना सांगितल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. त्यामुळे, नेमकं कोण खरं बोलतंय हे अद्यापही कोडंच आहे.  

राष्ट्रवादीचे शिबीर अजित पवारांनी गाजवले

दरम्यान, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने कर्जत येथे दोन दिवसीय शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीरातील भाषणानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गौप्यस्फोट केले. राष्ट्रवादीने वरिष्ठांच्या सांगण्यावरुन २०१४ मध्ये ज्या पक्षाला बाहेरुन पाठिंबा जाहीर केला तो पक्ष भाजप होता. आताही, भाजपासोबत जाण्याचे ठरले होते, शरद पवार यांना ते माहिती होते. तर, सुप्रिया सुळेही या बैठकीला हजर होत्या, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला. यावेळी, अनिल देशमुख यांच्या भूमिकेबद्दलही त्यांनी महत्त्वाची माहिती जाहीर केली.  

टॅग्स :अनिल देशमुखशरद पवारअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेस