'अजित पवार म्हणाले, भाजपाने अडीच-अडीच हजार मते आधीच ईव्हीएमध्ये भरली आहेत'; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 16:06 IST2026-01-09T16:02:57+5:302026-01-09T16:06:54+5:30
महापालिका निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ आलेली असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. अजित पवारांसारख्या उपमुख्यमंत्री असलेल्या जबाबदार माणसाने सांगितले की, भाजपाने अडीच-अडीच हजार मते ईव्हीएममध्ये आधीच भरली आहेत, असे राज ठाकरे म्हणाले.

'अजित पवार म्हणाले, भाजपाने अडीच-अडीच हजार मते आधीच ईव्हीएमध्ये भरली आहेत'; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा
"चार-पाच दिवसांपूर्वी... माध्यमांनी कुणी ते चालवले नाही. पण, अजित पवार स्वतः म्हणाले की, आमच्या लोकांना भाजपाने सांगितले गेले की, तुम्ही आमच्या पक्षामध्ये या. अडीच-अडीच हजार मते आम्ही आधीच मशीनमध्ये (ईव्हीएम) भरलेली आहेत", असा खळबळजनक दावा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
एका मुलाखतीत राज ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला की, 'नाशिक एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला होता. पुण्यात तुमची ताकद होती. तुमच्याबद्दल वातावरण होतं. तुमच्या पक्षाचे स्थान होते. तर आता या निवडणुकीमध्ये जे काही चालू आहे, तुमच्या पक्षाचे किंवा तुमच्या आघाडीचे ते समाधानकारण आहे, असे तुम्हाला वाटते का?'
'ज्यांच्या हातात सत्ता, ते या गोष्टी करतात'
राज ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला सांगतो की, मुंबई, ठाणे येथे आमचे व्यवस्थित आहे. काय झालं, एकतर आरक्षण आणि त्यात चारचे प्रभाग. या गोष्टींबद्दल इतका गोंधळ आहे ना. ज्यांच्या हातात सत्ता असते ना, ते अगोदरपासून या सगळ्या गोष्टी करतात."
"ज्यांच्याकडे सत्ता नाही, त्यांना तुम्ही कायमचे बेसावध ठेवता. आता साधी गोष्ट की, चार प्रभाग करायची काय गरज आहे. हे फॅड खरंतर काँग्रेसच्या काळात आलं. दोन प्रभाग, चार प्रभाग. मला कळत नाही की, एखाद्या मतदारांने तिथे जाऊन चार बटणे का दाबायची? अशा प्रकारची व्यवस्था भारतात कुठेच नाहीये", असे राज ठाकरे म्हणाले.
'मग विरोधकांना सांगायचं की आता लढा'
"प्रभागात चार नगरसेवक. चार वेगवेगळी माणसे निवडून येतात आणि मग कोणीच काम करू शकत नाही. कारण एखादा काम करायला गेला की दुसरा आडकाठी करतो. म्हणजे तो प्रभागाला काही अर्थच उरत नाही. याबद्दल उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात गेलो. ते म्हणतात की, हे निवडणूक आयोगाकडे येते. निवडणूक आयोग सांगतो की हा राज्य सरकारचा निर्णय आहे. मग आरक्षण पण सरकारचं पाडणार, प्रभागही सरकारच ठरवणार, सगळे सेट करायचे आणि मग विरोधकांना सांगायचं की आता लढा", अशी टीका राज ठाकरेंनी सत्ताधारी आणि निवडणूक आयोगावर केली.
"ज्यावेळी एक प्रभाग होता किंवा दोन होते, त्यातल्या त्यात बरे होते. आता चार प्रभागातील आरक्षण निघाल्यानंतर तर इतका गोंधळ आहे की, त्याचे तुम्ही काहीच करू शकत नाही. आमचे अनेक नेते चर्चेला बसले होते. काही प्रभाग इतके विस्कळीत होते की, आमचे काही महत्त्वाचे माणसे उभे राहू शकले नाहीत", असेही राज ठाकरे म्हणाले.
'भाजपाने आधीच अडीच-अडीच हजार मते ईव्हीएममध्ये भरली आहेत'
"तुम्ही (सरकार) विरोधकांना निवडणुकीला सामोर जायला सांगता. तुम्ही आधी सगळ्या गोष्टी सेट करतात. म्हणजे परवा दिवशी ते फार कुणी चालवले नाही. अजित पवार स्वतः म्हणाले की, आमच्या लोकांना सांगितले गेले की आमच्या पक्षात या म्हणजे भाजपामध्ये या. अडीच अडीच हजार मते आम्ही आधीच मशीनमध्ये (ईव्हीएम) भरलेली आहेत. पिंपरी चिंचवडला बोलले. माझ्या त्यांचा व्हिडीओ आहे", असा खळबळजनक दावा राज ठाकरेंनी केला.
"म्हणजे सत्तेमधील एक भाग जो महापालिकेत वेगळी निवडणूक लढवतोय. इतका जबाबदार माणूस, महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री अशा प्रकारचे विधान करतो की, मशीनमध्ये अडीच अडीच हजार मते भरलेली आहेत. मग आम्ही काय समजायचे? यात जिंकण्या हरण्याचा प्रश्न नाहीये, ही निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक नाहीये", असा खळबळजनक दावा राज ठाकरे म्हणाले.