कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 19:36 IST2025-07-09T19:14:14+5:302025-07-09T19:36:58+5:30

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी वाटपाच्या मुद्द्यावरुन भास्कर जाधव यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

Ajit Pawar responded to Bhaskar Jadhav criticism on the issue of fund allocation | कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर

कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर

Ajit Pawar on Bhaskar Jadhav: शिवसेना ठाकरे  गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात निधी वाटपाच्या मुद्द्यावरुन दोन दिवसांपूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. पुरवणी मागण्यांवर बोलताना भास्कर जाधव यांनी अजित पवार यांच्या वित्त विभागाच्या कार्यपद्धतीचे वाभाडे काढले होते. कोणत्या विभागाला किती निधी द्यायचा हे अर्थमंत्री ठरवत आहे,  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत राजकारण करू नका, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं. त्यानंतर बुधवारी अजित पवार यांनी पुरवणी मागण्यांवर उत्तर देताना भास्कर जाधव यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

अर्थमंत्री ठरवतील त्यांना निधी अशा पद्धतीने अर्थखाते चालू शकत नाही. अर्थमंत्रीच जर निधी देणार असतील तर मग, अर्थसंकल्प मांडता तरी कशाला? अर्थसंकल्पातल्या तरतुदींना काही अर्थ आहे की नाही? यापूर्वी कोणी अर्थमंत्री झाले नव्हते काय? अशा शब्दात भास्कर जाधव यांनी अर्थमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं होत. त्यावर अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. इतरांनी उपदेश करण्याचे कारण नाही असं अजित पवार म्हणाले.

सात टर्म आमदार असताना छत्रपतींचा पुतळा का उभारला नाही?

"सभागृहात सगळ्यांनाच आपापली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. काल सभागृहात नसताना भास्करराव जाधव हे काय म्हणाले याविषयी मला सांगण्यात आले. आमचं सरकार तीन पक्षाचं आहे. मला इतकच सांगायचं आहे की भास्करराव जाधव आपण कोणत्या कोणत्या विभागाला किती निधी दिलेला आहे हे जरा पहा. भास्कर जाधव यांनी सांगितले की, त्याच्या गुहागर येथील मतदारसंघांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारायचा आहे. यासाठी मी अजित पवारांना पत्र दिलं, पण यावर अजित पवार होय ही देखील बोलले नाहीत, नाही ही देखील बोलले नाही. म्हणूनच ते नाराज आणि अस्वस्थ झाले. मला सांगायचं आहे की, भास्कर जाधव यांच्या आतापर्यंत सहा टर्म पूर्ण झाल्या आहेत आणि ही सातवी टर्म सुरू आहे. या इतक्या टर्ममध्ये ते मंत्री होते, ते नगर विकास खात्याचे राज्यमंत्री देखील होते. मग इतक्या वर्षांमध्ये चिपळूण आणि गुहागर सारख्या भागांमध्ये प्रतिनिधित्व करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा का उभा केला नाही? मला ते काही कळलं नाही. भास्कर जाधव यांनी सांगितलं की, आमच्या गोगावले साहेबांच्या रत्नागिरी जिल्ह्यामधील आठ तालुक्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे पण आमच्या इथे महाराजांचा पुतळा नाही. वास्तविक इतक्या वर्षांमध्ये पुतळा उभा केला नाही आणि संपूर्ण खापर आमच्या माती मारायचं," असं अजित पवार म्हणाले. 

मला दिलेल्या अधिकाराच्या बाहेर मी जात नाही - अजित पवार
 
"भास्कर जाधव यांनी अर्थखात्याचे ते मालक आहेत का? अर्थमंत्री कोणाला पैसे देणार हे कसं ठरवू शकतात. अर्थमंत्री स्वतःला कोण समजतात. त्यांनाही माहिती आहे की अर्थखातं सगळ्यांना निधी देतं. त्याच्यावर अजित पवारची सही असली तरी एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची सही असते. एकदा निधीचे वाटप झाल्यानंतर त्या खात्याच्या मंत्र्यांना अधिकार असतो की, कोणाला किती निधी द्यायचा. पण भास्कर जाधवांनी हे वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. मी स्वतःला कोणीही समजत नाही. मी राज्याचा अर्थमंत्री आहे. जो मला अधिकार मंत्रिमंडळाने दिला आहे त्याच्याबाहेर मी जात नाही. महाविकास आघाडीमध्येही मी काम केलं आहे. त्यामुळे सर्वांना बरोबर कसं घेऊन जायचं याचा आम्हाला ज्ञान आहे. त्यामुळे इतरांनी उपदेश करण्याचे कारण नाही.  कुणाचा तरी राग माझ्यावर काढण्याचे कारण नाही. मला कुणालाही दोष द्यायचा नाही," असंही अजित पवार यांनी म्हटलं.

Web Title: Ajit Pawar responded to Bhaskar Jadhav criticism on the issue of fund allocation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.