अजित पवारांचा आता ‘मित्रा’च्या कामाचा आढावा; मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षेत्रावर अतिक्रमण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 09:21 IST2023-08-19T09:20:28+5:302023-08-19T09:21:32+5:30
आधी ‘वॉर रूम’, आता ‘मित्रा’चे कामकाज; मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षेत्रावर अतिक्रमण केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा.

अजित पवारांचा आता ‘मित्रा’च्या कामाचा आढावा; मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षेत्रावर अतिक्रमण?
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्पांच्या आढाव्यासाठी ‘वॉर रूम’ची स्थापना केलेली असताना, त्याला बाजूला सारत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट’ची स्थापना करून मागील आठवड्यात राज्यातील प्रकल्पांचा आढावा घेतला होता. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात ‘कोल्ड वॉर’ सुरू असल्याची चर्चा शांत झालेली नसतानाच शुक्रवारी अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या ‘मित्रा’च्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षेत्रावर त्यांनी अतिक्रमण केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा सुरू झाली आहे.
केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात स्थापन करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ अर्थात ‘मित्रा’च्या कामकाजाचे सविस्तर विशेष सादरीकरण बैठकीत करण्यात आले. देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राने ‘एक ट्रिलियन’ डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘मित्रा’ची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास अजित पवार यांनी बैठकीत व्यक्त केला.
वरिष्ठ अधिकारी बैठकीला होते उपस्थित
बैठकीला ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सौरभ विजय, अपर मुख्य सचिव दीपक कपूर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.