Join us
Daily Top 2Weekly Top 5

सध्याच्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत अजित पवार यांनी दिले मोठे संकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 23:25 IST

बहुमत मिळाल्यानंतर सत्तास्थानांच्या समान वाटपावरून भाजपा आणि शिवसेनेमध्ये तणाव निर्माण झाला आहे.  दोन्ही पक्षांमधील मतभेदांचा फायदा घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून वेगवेगळे डाव टाकण्यात येत आहेत.

मुंबई -  बहुमत मिळाल्यानंतर सत्तास्थानांच्या समान वाटपावरून भाजपा आणि शिवसेनेमध्ये तणाव निर्माण झाला आहे.  दोन्ही पक्षांमधील मतभेदांचा फायदा घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून वेगवेगळे डाव टाकण्यात येत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ दलाचे नेते अजित पवार यांनी आगामी सरकार स्थापनेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबाबत मोठे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षात बसण्यासाठी जनतेने कौल दिला आहे. त्यामुळे विरोधात बसण्याची आमची मानसिकता आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत भाष्य करताना अजित पवार म्हणाले की, ''नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षात बसण्यासाठी जनतेने कौल दिला आहे. त्यामुळे विरोधात बसण्याची आमची मानसिकता आहे.'' दरम्यान, संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यात झालेल्या भेटीबाबत आपल्याला माहिती नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप राज्यात सरकार स्थापन झाले नाही. भाजपा आणि शिवसेना यांच्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटला नाही. सत्तेत महत्त्वाचा वाटा मिळावा, यासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज सकाळी सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. तब्बल अर्धातास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. यावेळी संजय राऊत यांनी दिवाळीनिमित्त शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांची भेट घेतली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, संजय राऊत आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.  दुसरीकडे भाजपाने शिवसेनेला दुय्यम लेखण्याचा पवित्रा कायम ठेवला असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भाजपाला रोखठोक इशारा दिला आहे. मुख्यमंत्रिपदाचा अमरपट्टा घातल्याचं कुणी समजू नये, असे खडेबोल उद्धव ठाकरे यांनी भाजपाला सुनावले आहे. आज शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. त्यावेळी उपस्थित आमदारांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासह सत्तेचे समसमान वाटप करण्याबाबत आडमुठी भूमिका घेणाऱ्या भाजपाला खडेबोल सुनावले. ''युतीची घोषणा करताना सत्तावाटपाचा जो फॉर्म्युला ठरला होता त्यानुसार अधिकारपदांचे वाटप व्हायला हवे. कुणी मुख्यमंत्रीपदाचा अमरपट्टा घातला आहे, असं समजू नये असे उद्धव ठाकरे म्हणाले.  

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसराजकारणमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019