Join us  

अजित पवारांनी डिलीट केलं 'ते' आदरांजलीचं ट्विट, सांगितलं राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 4:12 PM

पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनता पक्षाचा मूळ अवतार असलेल्या जनसंघाचे सहसंस्थापक असून आज त्यांची जयंती आहे. भाजपच्या सर्व नेत्यांनी ट्विटरवरून त्यांना आदरांजली वाहिली आहे.

ठळक मुद्देपंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनता पक्षाचा मूळ अवतार असलेल्या जनसंघाचे सहसंस्थापक असून आज त्यांची जयंती आहे. भाजपच्या सर्व नेत्यांनी ट्विटरवरून त्यांना आदरांजली वाहिली आहे.

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणातील मातब्बर आणि बेधडक नेते म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ओळख आहे. आपल्या कामाच्या स्टाईलमुळे आणि बिनधास्त भाषणशैलीमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. वरिष्ठ नेत्यांचा आदर व सन्मान करताना ते महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शनही आपल्या आचरणातून घडवतात. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन अशा दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहताना दिसून येतात. आजही, अजित पवार यांनी  भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणारं ट्वीट केलं होतं. मात्र, काही वेळातच त्यांनी हे ट्विट डिलीट केलंय. 

पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनता पक्षाचा मूळ अवतार असलेल्या जनसंघाचे सहसंस्थापक असून आज त्यांची जयंती आहे. भाजपच्या सर्व नेत्यांनी ट्विटरवरून त्यांना आदरांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मात्र, अजित पवारांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांना अभिवादन केल्यानंतर चांगलीच चर्चा झाली. विशेष म्हणजे अजित पवारांचे हे ट्विट अनेकांनी व्हायरलही केले. मात्र, वरिष्ठांचा आदेश येताच, उपमुख्यमंत्र्यांनी ते ट्विट डिलीट केलंय. अजित पवार यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन केल्यामुळे सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली होती. कारण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही नेत्याने त्यांना आदरांजली वाहिल्याचे ट्विट केले नव्हते. मात्र, भाजपाच्या सर्वच नेतेमंडळींना पंडित दीनदयाळ यांना आदरांजली वाहिली आहे. त्यामुळे, माध्यमांमध्ये वेगळीच चर्चा रंगल्याने अखेर वरिष्ठांच्या आदेशानंतर अजित पवारांनी आपले ट्विट डिलीट केलं. 

''अजित पवारांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना याबाबत खुलासा केला. 'हयात नसलेल्या व्यक्तींबाबत चांगलं बोलणं ही आपली संस्कृती व परंपरा आहे. त्यानुसार मी हे ट्वीट केलं होतं. परंतु समाजकारण, राजकारण करत असताना वरिष्ठांचं ऐकावं लागतं, इतर गोष्टीही असतात,'' असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्र्यांनी दिलं. 

पहाटेची शपथ आठवली

महाविकास आघाडीच्या स्थापनेपूर्वीच कुणाच्या ध्यानीमनी नसताना अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाल्याची चर्चा सर्वत्र रंगली. पण, अखेर शरद पवार यांच्यापुढे अजित पवारांनी आपल्या भूमिकेची माघार घेत उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर, महाविकास आघाडी सरकारमध्ये पुन्हा उपमुख्यमंत्रीदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी आज ट्विट डिलीट केल्यानंतर काहींना जुन्या शपथविधीची आठवण झाली आहे. दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अजितदादांनी मांडलेली भूमिकाही अशीच चर्चेचा विषय ठरली होती. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांनीही पक्षाच्या भूमिकेविरोधात ट्वीट करून खळबळ उडवून दिली होती.

टॅग्स :अजित पवारट्विटरराष्ट्रवादी काँग्रेसभाजपादेवेंद्र फडणवीस